मोकळा श्वास .......!

मोकळा श्वास .......! मैत्रिणींसाठी हक्काचं व्यासपीठ.

Sunday 25 March 2018

कचरा वर्गीकरण - एक पाऊल स्वच्छतेकडे


औरंगाबादच्या  कचरा कोंडीची बातमी पाहून माझ्या मनात विचार आला, फक्त औरंगाबादच नाही तर बऱ्याच ठिकाणी हा प्रश्न पुढे मागे निर्माण होऊ शकतो. याला कळत नकळत आपण सारेच जबाबदार आहोत का? तर याचे उत्तर नक्कीच हो येईल बरोबर ना. आपल्या सगळ्याना सुखी जीवन हवे असेल तर चला कचरा वर्गीकरण करून, एक पाऊल स्वच्छतेकडे टाकू आणि स्वच्छ औरंगाबाद करूयात.

आपण सगळे कमीतकमी कष्ट करून जास्तीत जास्त सुखात राहायचा प्रयत्न करतोय. वापरा आणि फेका ही प्रवृत्ती आपल्या सगळ्यामध्ये निर्माण होत चालली आहे. त्याकडे किमान आता तरी गंभीर प्रश्न म्हणून पाहिले पाहिजे. 


युज अँड थ्रो- प्लास्टिक कचरा

आपल्या घरात छोटासा कार्यक्रम असला की आपण लगेच यूज अँड थ्रो चे ग्लास, चमचे, द्रोण, प्लेट आणतो , वापरतो आणि देतो. घरात शोकेस मध्ये मारे ऐटीत ग्लास, डिनर सेट ठेवलेले असतात, पण ते वापरले तर परत धुणार कोण? म्हणून आपण ते फक्त शोकेसची शोभा वाढवण्यासाठीच ठेवतो, धुवायला वेळ कोणाला आहे? सांगा बरं.


बिस्लरी बाटल्या

 पूर्वी गावाला जाताना आपण मोठ्या वॉटर बॅग्ज न्यायचो.पण आता ठिकठिकाणी बिस्लरीच्या बाटल्या घेतो, दिसेल त्या जागी वापरून फेकून देतो.

नॅपकिन्स

लहान मुलांचे लंगोट हा प्रकार तर आपण विसरूनच गेलोय. हगीज,सॅनिटरी नॅपकिन्स ! सरासपणे वापले जाते.  हात पुसायला रुमाल ऐवजी पेपर नॅपकिन्स! बापरे! वापरा आणि फेका असा किती कचरा टाकतो आपण !


 पॉलिथीन पिशव्या   

 पूर्वी वाण सामान आणताना घरातूनच तेलाची बरणी, तुपासाठी डबा न्यावा लागायचा. आता यासाठी विविध प्रकारच्या पॉलिथीन पिशव्या किंवा बाटल्या मिळतात, नंतर त्या आपण फेकून देतो.




स्वतंत्र पिशवीचा हट्ट 

पूर्वी लग्नाचा कितीही मोठा बस्ता बांधला तरी तो एकाच मोठ्या कापडात  गाठोडं करून मिळायचा. आता प्रत्येक साडीसाठी व कपड्यासाठी स्वतंत्र पिशवीच आपला अट्टाहास असतो.






वापरा आणि फेका वृत्ती


वस्तू दुरुस्तीकडे आपला कल नसतो. बूट, चप्पल, खेळणी, छत्री अशा गोष्टी आपण लगेच फेकून नव्या घेतो. त्या वस्तूचा दुरुस्त करून पुन्हा वापर करणे ही  संकल्पना आपल्याला रुचत नाही त्यामुळे अशी असंख्य उदाहरणे सांगता येतील. याला जबाबदार कोण? याचे उत्तर म्हणजे सध्याचे धावते युग म्हणावे लागेल. कोणालाही विचार करायला वेळ नाही. रात्र थोडी सोंगे फार. प्रत्येक जण आपापल्या कोशात आणि व्यापात इतका अडकलाय की त्याला स्वतःच्या आयुष्याची कोंडी फोडायला वेळ नाही तर कचरा कोंडीचं काय घेऊन बसलात ?


पार्सल            

कंटाळा आला की आपण पटकन एखाद्या हॉटेलमधून जाऊन जेवण ऑर्डर करतो, पण हे पार्सल फोडल्यानंतर होणाऱ्या कचऱ्याने एक अक्खी कॅरी बॅग भरते, पण आपण मात्र वेगळ्याच आनंदात असतो.

इलेक्ट्रॉनिक वस्तू

आपल्या दैनंदिन जीवनात आपण लाईट, फॅन आणि इतर अनेक वस्तूचा वापर करतो, पण ह्या वस्तू खराब झाल्या की आपण बिनधास्त कचऱ्यात टाकतो. त्या टाकताना लाईटच्या काचा फुटतात. त्यापासून इजा होऊ शकते.

मित्र मैत्रिणीनो आता कचरा गोळा करताना त्याचे वर्गीकरण करा. म्हणजे ओला सुका आणि इतर वस्तू आदींचे. यामुळे आपले आणि आपल्या आप्तस्वकीयांचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदत मिळेल.



प्रतीक्षा परिचारक-पाठक
औरंगाबाद

Saturday 24 March 2018

कचरा हा वैयक्तिक प्रश्न ?


आपण कचरा आणि केरसुणी ला लक्ष्मी मानणारे  माणसं . मग या पुढे कचरा कधीच बाहेर फेकायचा नाही. ऐका  तर मग कचरा या विषयी  मनिषा  मुळे यांची ऑडिओ क्लिप .

मनिषा  मुळे 
औरंगाबाद  

डोळ्यात येईल पाणी.....!

शहरातल्या कचऱ्याची फुटेना कोंडी,.........
अन सकाळी सकाळी बायको,
लागली माझ्या तोंडी,......
डब्याच्यापिशवीला हात केला पुढे
तर म्हणे,
कचऱ्याच्या पिशव्यानंचे 
सोडवा आता तिढे,.....
साचलेल्या कचऱ्याचा सुटतोय वास,....
लहान काय मोठं काय सगळ्यांनाच त्रास...
रस्त्यावरचे ढिगारे पाहून
मुलं विचारतात प्रश्न,...
कसं असत ग 
ह्या माऊंनटेनच तयार होणं?
सडतोय, कुजतोय.....
आजारही पसरवतोय ,....
माणसानेच निर्माण केलेला कचरा
माणसालाच रडवतोय,....
युज अँड थ्रोच्या जमान्यात
एक मात्र दिसून आलं,....
इन्स्टंटच्या वेडान,
प्रदूषणाला आमंत्रण गेलं,..
आता तरी माणस,
व्हावी जरा शहाणी,...
कमी कचरा करण्याचं,
वचन घ्यावं सर्वांनी,....
आणि पाहून परिस्थिती औरंगाबादची,...
कृपा करावी निसर्गानी,...
उन्हाळाच चालू द्यावा,...
पडू नाही पावसानी,..
नाहीतर मग साऱ्यांच्या,...
डोळ्यात येईल पाणी,.....
             💐स्वप्ना

" कचराच कचरा सगळीकडे ग बाई ,गेला माणूस कुणीकडे"

 " कचराच कचरा सगळीकडे ग बाई ,गेला माणूस कुणीकडे"  आज रस्त्यावर ,जिकडे तिकडे इतस्ततः 
आपणास कचऱ्याचे ढिगारे पडलेले दिसतात ,पण कधी विचार केला का कि या परिस्थितीला जबाबदार कोण ? 
खरं तर माणसाने निर्माण केलेली स्थिती स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलेली आहे .
         घर स्वच्छ , नीटनेटके असण्याकडे आपला पूर्ण कटाक्ष असतो .घर साफ करण्याच्या नादात घरातील घाण 
आपण रस्त्यावर फेकतो .कचरा कुंडीत , प्रशासनाने नेमून दिलेल्या जागेवर कचरा टाकला तर कोणालाच अडचण होणार नाही. 
 परंतु नियम  पाळले तर मानव जात कशी  जरा अतिरेक वाटत असेल पण स्वतःच अवलोकन करा किया जगात नियमांनी 
चालणाऱ्या लोकांची संख्या किती आणि नियम न पाळणारे किती लोकसंख्या आहेत ?
     'कचरा ' हा विषय इतका गहन आहे कि त्यावर नुसती चर्चा करून प्रश्न सुटणार नाही . 
कचऱ्याचे निर्माते आपण सर्वे सर्व असल्याने यावर उपाय शोधणे ,व्यवस्थापन करणे आणि अंमलबजावणी करणे 
हि आपलीच जबाबदारी आहे काचऱ्या सारखी गोष्ट किती महत्वाची आहे हे साठून राहिल्याशिवाय कळत नाही रस्त्याने 
जाताना कचऱ्याची गाडी बाजूनी जाऊ लागली तर त्याच्या दुर्गंधीने आपण नाक बंद करतो .जी घाण आपणच निर्माण केली आहे. 
 ती जर आपल्याला सहन होत नसेल तर इतरांनी त्याचा त्रास का सहन करायचा?
     विदेशात फिरून आलेली व्यक्ती तेथील स्वच्छतेची गोडवे गाताना दिसतात. पण विरोधाभास असा आहे कि त्यांना येथील स्वच्छतेचे भान नसते. 
हे म्हणजे असे कि "लोक सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण". आपल्या देशात कोणाचा कोणाला धाक नाही, कोणी कोणाला भीत नाही,
 या बाबतीत घडलेली एक सत्य घटना :
विदेशातून भारतात शिफ्ट होताना एका व्यक्तीने घरातील सर्व प्रकारचा कचरा एकत्र केला आणि कचरा कुंडीत टाकला. 
एअरपोर्टवॉर पोहोचताच त्याला तिथल्या ऑथॉरिटी कडून फोने आला कि कचरा एकत्र टाकल्या बद्दल त्याला दंड आकारण्यात आला आहे.
 हीच घटना भारतात झाली असती तर त्यावर कोणतीच कारवाई केल्या गेली नसती. याचे कारण सर्वानी शोधून काढावे.
कचरा करणे, कचऱ्याची विल्हेवाट लावणे, त्याचे वर्गीकरण करणे हि आपल्या प्रत्येकाची "नैतिक" जबाबदारी आहे.  

प्रत्यक्षात घडलेली दुसरी घटना:

रस्त्यावरून चालू कार मधून एका व्यक्तीने रॅपर बाहेर फेकले. हे प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार ने बघितले. ताबडतोब त्याने ती गाडी थांबवली. खुद्द अक्षय कुमार ला समोर पाहून त्या व्यक्तीस खूप आनंद झाला. काही क्षणातच अक्षय कुमार ने ते रॅपर उचलून त्या फेकणाऱ्या व्यक्तीच्या गाडीत टाकले. 

     रस्त्यावर, इतरत्र, कोठेही कचरा टाकू नये त्याचे हे बोलके उदाहरण आहे. 

      एक विनोदाचा भाग म्हणणं पहिला तर एका मुलीला तिची आई कचरा देते व 'माणूस बघून कचरा ताक' असे सांगते.
 किती वेळ झाला तरी मुलीला गॅलरी मध्ये बघून ती कारण विचारते तेव्हा मुलगी म्हणते कि 'अगं आई अजून एक पण माणूस नाही आला. '
 म्हणजे कचरा घरातून, गल्लेरीतून, गच्चीतून, कुठूनही फेकतो.

      शहरातील कचऱ्याचे ढिगारे वाढण्याचे मूळ कारण आपण स्वतःच आहोत.  साठलेल्या ढिगांमुळे रोगराई पसरते, प्रत्येकाचे आरोग्य धोक्यात येते. निरुपद्रवी प्राण्यांचा सुळसुळाट होतो. हि परिस्थिती काबूत आणण्यासाठी पुढील प्रमाणे काही उपाययोजना करता येतील :
१. कचरा योग्य ठिकाणीच टाकावा
२. कचऱ्याचे वर्गीकरण करावे
३. पुनर्वापर करता येणाऱ्या कचऱ्याचा योग्य उपयोग करावा

    अशी साधीच पण महत्वाची निर्बंध स्वतःवर लादून घेतली तर कचऱ्याची समस्या कमी होण्यास पुष्कळ मदत होईल. प्रत्येक वेळेस शासनाचं जबाबदार असते असे नव्हे तर बऱ्याच अंशी चुका करणारे आपणही आहोत. सध्या कचऱ्याचे ढिगारे आहेत परंतु हि परिस्थिती जर अशीच वाढत गेली तर कचऱ्याचे डोंगर होण्यास वेळ लागणार नाही. म्हणूनच नियमांचे पालन करावे, कचऱ्याच्या व्यवस्थापनात हातभार लावावा आणि सामाजिक स्वच्छता राखावी.

"मी बाई कचरा किती माझे हाल हाल
सर्वाना वाटते स्वतः राहावे खुशहाल'
ओल्यात सुका मिसळताना माझे होतात बेहाल
स्वच्छता झाली म्हणून सारे आहेत mastawal
शिक्षा म्हणून आकार यांच्यावर दंड
मग मात्र लगेच पुकारत बंद
मोर्चे काढणार, भाषण ठोकणार कचरा निर्मूलनासाठी
स्वतः मात्र कोरडे पाषाण परिसरातील स्वच्छतेसाठी
सार्यांनी एकत्र येऊन गरज आहे विचार करण्याची 
कचरा निर्मूलनाचा प्रश्न मार्गी लावण्याची... 

--सौ. शिवांगी विजय कुलकर्णी
संभाजीनगर 

Flying Jatt



"कचरा" हा विषय खरंच खूप गंभीर आहे, त्याची सुरुवात प्रथम आपल्यापासूनच व्हायला पाहिजे. 
तसेही प्रशासन कचरा निर्मूलनासाठी बरीच माहिती प्रसारित करत राहते. एक नागरिक म्हणून तरी आपण हा प्रश्न 
नीट हाताळला पाहिजेच. आपण ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा करून दिला पाहिजे जेणे करून 
पुढील कचरा प्रवास smoothly होईल आणि कर्मचाऱ्यांना सुध्दा त्याचे वर्गीकरण करणे सोपे होईल. 
बराच अशा काही गोष्टी असतात ज्या आपण reuse सुध्दा करू शकतो किंवा टाकाऊ पासून टिकावू वस्तू पण बनवू शकतो. 
बऱ्याच प्लास्टिक  bottols आपण तश्याच फेकून देतो , कॅरीबॅग मध्ये कचरा भरून फेकतो , 
जे नैसर्गिक विघटन होणारे  कचरा आहे त्या पासून आपण खत बनवू शकतो, ते आपल्या कुंड्यामध्ये वापरू शकतो, 
विविध उपयोगी वस्तू आपण थोडे विचार केले तर तयार करू शकतो. आजकाल खूप मोठ्या प्रमाणात e -कचरा जमा होत आहे. 
 यात मोबाइल, कम्पुटर ,वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक साहित्य बाद झाले कि ते आपण टाकून देतो, हे सगळे 
पर्यावणाला खूप हानिकारक आहेत आणि त्यांचे रीसायकलिंग पण खूप हानिकारक आहे त्यात तयार होणारे धूर हे 
पर्यावरण तसेच आरोग्यासाठी हि हानिकारक आहेत. 
Flying Jatt मूवी आठवली कि अंगावर काटाच येतो खरंच आपणच आपल्या  विनाशाला कारणीभूत ठरू असे दिसते. 

तुमचीच सखी 
"माझे पान"  

Saturday 17 March 2018

ताळमेळ जुळून येईल..... !


मनिषा  मुळे यांची ऑडिओ क्लिप .
सासर माहेरच्यांनी नवीन नात फुलवण्यास मदत केल्यास  हा ताळमेळ जुळून येऊ शकतो. 


मनिषा  मुळे 
औरंगाबाद   

'तारेवरची कसरत'

ताळमेळ माहेर आणि सासर मध्ये तसे पाहायला गेले तर जीवन म्हणजेच 'तारेवरची कसरत' आहे.
 येथे प्रत्येक जीवाला जगताना बरीच तडजोड करत जगावे लागते त्यात नवीन विशेष असे काही नाही
आणि सर्व करत करत प्रत्येकाला " जीवन जगण्याची कला" हि अवगत होऊन जाते.😄
तसेच स्त्रीयांच्या बाबतीत होते , लग्नानंतर त्यांचे जीवनात बरेच बदल होतात.
 त्यांची राहण्याची जागा, घर, माणसे आणि त्यांचे विचार सुद्धा अगदी अचानक बदलून जातात .
मग सुरु होते तडजोड आणि सुरु होतो प्रवास तारेवरच्या कसरतीचा .....😇
माझ्या माहेरी आई वडील मी आणि माझे भाऊ आणि भरपूर नातेवाईक असे आमचे कुटुंब.
 त्यात मी सर्वांची लाडकी बडबडी हट्टी आणि अभ्यासुकिडा असणारी मुलगी.
माझे लग्न २०व्या वर्षीच झाले त्यामुळे एकदम  सगळ्या जबाबदारी अंगावर आली.
 कधीही कसले टेन्शन न घेणारी मी एकदम टेन्शन मधेच आले
सासरी नवरा आणि सासूबाई एवढेच आम्ही तरीपण स्वभाव अगदी भिन्न ते  एकदम  शांत , शिस्तप्रिय आणि नीटनेटके  राहणारे
आणि मी मनाला वाटलं तस जगणारी, अगदी झोपच यायची नाही सुरुवातीला माहेरची खूप आठवण यायची.
 पण एक बरे होते माझे शिक्षण सुरु होते त्यामुळे माहेरी सारख्या वाऱ्या व्हायच्या त्यामुळे हळूहळू सगळे जमवून घ्यायला शिकले.
पाहता पाहता १३वर्षे झालीत लग्नाला माझ्या आता संसारात चांगली मुरल्यासारखे वाटते.
आता माहेरी जाण्याची ओढ पण जास्त नाही राहिली आठवण येते आई पप्पांची पण फोनमुळे सर्व जवळ जवळ असल्यासारखे वाटते
उलट माहेरी आता वहिनी लोकांचं राज्य असल्यामुळे त्यांच्या मध्ये जास्त बोललेले पण नको वाटते.
  "ज्याचे संसार, त्यांनीच पाहावे " या मताची असल्यामुळे माझे पण मी कोणाजवळ जास्त बोलत नाही.
आधी सांगितलं प्रमाणे प्रत्येकाला "जीवन जगण्याची कला" हि अवगत होऊन जाते
आता बऱ्याच सवयी बदलल्या मी एक समजदार , कर्तव्यदक्ष , प्रेमळ पत्नी आणि आई झाले आहे.
चोवीस तास डोक्यात फक्त घर आणि घरातील लोकांची काळजी असते.
 त्यांच्या आवडी निवडी , त्यांचे शिक्षण परत पुढील भविष्याचे विचार  करण्यात कसा दिवस निघून जातो कळत सुद्धा नाही 


तुमचीच सखी 
"माझे पान"  

"अक्षदा पडल्या, सुनमुख झाले,..

"अक्षदा पडल्या, सुनमुख झाले,..
 झाली आता वरात ,अभिजीतरावांसोबत टाकते पहिले पाऊल घरात,.."
     पंधरावर्षांपूर्वी टाकलेलं हे पाऊल ह्या सासुरवाडीतच इतकं रमले की माहेर असत ह्याची आठवण असली तरी खूप ओढ नाही राहिली ....
       त्याला कारणही तसंच माहेरी बाबा कडक असल्यामुळे ह्यापेक्षा कोणी कडक असेल असं वाटलं नाही,.... माहेरी खानावळ असल्यामुळे 50 लोकांच्या स्वयंपाकाला न घाबरणार्या आम्ही सासरी 4 माणसाच्या स्वयंपाकाला घाबरायचं कारणच नाही,...प्रचंड संघर्ष केलेला असल्यामुळे सासरी डगमगलो नाही,....
     सासुनी मायेने शिकवले घरचे रितीरिवाज,... आणि सासऱ्यानेही दिली कलेला उत्स्फूर्त दाद,....
     ज्या सासूने 15 वर्ष हातात पेन धरला नाही तिनी लग्ना आधी मला चिट्ठी लिहिली होती,....
"घरात जे काही होईल ते या चार भिंतीत ठेव,, भांड्याला भांड लागणारच,....मिळालेल्या चटणी भाकरीत आपण सुखी राहू,...."
 आईची भूमिका सासूने कधीच सुरू केली होती,....
    मी माहेरी गेले तरी त्या म्हणायच्या "लवकर येत जा ग उभे वारे सुटतात ..."
      इतकं प्रेम जिथे तिथे माहेर नकळत सासर झालं आणि सासर माहेर झालं,....
      माहेर आजही आयुष्यात मिठासारखं आहे,....वर्षभरातली छोटीशी नमकीन भेट,....पण सासर मात्र सगळं आयुष्य व्यापून आहे कारण तिथे माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात माझ्यासाठी अतोनात प्रेम आहे,.....
      कुणाला वाटेल काय ही बाई सासरातच रमली,...पण मला आजही वाटतं माझ्या मुलीलाही असच सासर मिळावं आणि माहेरचं स्थान तिच्या संसारातही मीठाप्रमाणे रहावं........

                   💐स्वप्ना

Saturday 10 March 2018

दिवस असे कि फुलायचे.............


 सुंदर अशा गाण्यातून ''लग्नापूर्वीची मी -आजची मी'' या विषयावरील मनिषा  मुळे यांची ऑडिओ क्लिप .

मनिषा  मुळे 

औरंगाबाद   

मन मोकळे .......!


"HAPPY WOMANS DAY TO ALL MY DEAR FRIENDS"

पहिली मी आताची मी विचार येताच एक हसू येत खरंच किती फरक पडतो ना मुलींमध्ये लग्नानंतर 
माझा नवरा तसाही टोमणे मारतच असतो "कशी गरीब शेळी ची वाघीण झालीस ते"
मी एक लाजरी, बुजरी, एकलकोंडी , अभ्यासू आणि एका चौकटीतील ,त्या बाहेरील वातावरणाची कधीही
चव न पाहिलेली. अगदी अतिरेक म्हणजे माझे आई वडील भाऊ , 
 नातेवाईक आणि मोजक्याच मैत्रिणी (ज्यांच्यासोबत आजहि  आहे )
 एवढेच माझे जग होते. त्या व्यतिरिक्त इतर कोणासोबत न बोलणारी मी, 
 आज लोकांचे कान उघडे पर्यंत त्यांना lecture 
देऊ शकते आणि आता मैत्रिणी सुद्धा भरपूर आहेत माझ्याकडे...तुमच्यासारख्याच !!!

लग्नापूर्वीची"मी "
आताची "मी "
लांबसडक केस नेहमी दोन वेण्या
 वर टांगलेल्या 
छोटे केस  शॉर्ट / लाँग लेअर कट 
बारीक सडपातळ  
भरीव
आईपप्पांची लाडकी 
नवऱ्याची डोकेदुखी 
थोडी हट्टी
थोडी समजदार 
एकलकोंडी 
बडबडी
अभ्यासुकिडा
सर्वगुण संपन्न नारी  
भित्री  भागूबाई  
quite धीट
शाळा कॉलेज एवढाच प्रवास करणारी  
ऑफिस सांभाळून घरातील बरीच 
कामे एकटीने पूर्ण करणारी 
मोजक्याच मैत्रिणी 
भरपूर मैत्रिणी 
मनातच बरेच विचार ठेवणारी 
खूप बडबडी आणि मन मोकळ्या
 गप्पा मारणारी 
सायकल वर भावाला कधीही डबल सीट  घेणारी 
आता दोघही मुलांना घेऊन गाडीवर 
 सोडवणारी
TV बंद करून अभ्यास करण्यासाठी भांडणारी 
मुलांनी TV चा अतिरेक करू नये 
म्हणून लक्ष  ठेवणारी  
आईने मदत करायला बोलावल्यावर हातात 
पुस्तक घेऊन बसणारी 
मुलांनाही स्वावलंबीपना शिकवणारी 
स्वयंपाकापासून चार हात लांब राहणारी 
भरभर cooking करणारी ,
 मुलांच्या नवर्याची  आवड जपणारी
लाजरी बुजरी अगदी कधीही jeans  घातलेली   
थोडी खट्टी थोडी मिठी कधी jeans 
तर कधी शालू दिमाखात मिरवणारी 
सलमान खान आणि माधुरी वर
 मनापासून माणारी 
आता TV ला राम राम म्हणणारी 
छोट्या छोट्या गोष्टी मनाविरुद्ध झाल्या
 मुसुमुसु रडणारी 
सगळ्या गोष्टी मनासारख्या घडवून
 आणण्यात expert 
प्रत्येक गोष्ट आईला सांगणारी
अजूनही तशीच प्रत्येक गोष्ट आईला
 सांगणारी


एक आई आणि एक मुलगी यांच्यातील नातं कधीही बदलत नाही आणि आई जवळच आपले सगळे मन मोकळे होते.

तुमचीच सखी
माझे पान  

Sunday 4 March 2018

आयुष्यात खरी परीक्षा आईच देत असते


आयुष्यात खरी परीक्षा आईच देत असते . 

हे अगदी खरे आहे .  ऐका मग  मनीषा मुळे यांची हि ऑडिओ क्लिप 




मनिषा  मुळे 
औरंगाबाद 

Saturday 3 March 2018

मनाचा मुजरा समस्त "स्त्रियांसाठी / आईसाठी "


मुळातच काय आहे ना , एखादी शक्ती असेल तर तिची प्रचिती येण्यासाठी तिला फार संकटातून जावे लागते आणि त्यातूनही ती कसा मार्ग काढते आणि पुढे जाते हे सर्वाना बघितल्यावर कळत कि हि शक्ती किती परीक्षा देत असते. 
स्त्री चा जन्मही अगदी असाच आहे , तिला जन्मापासून तर शेवट पर्यंत परीक्षाच द्याव्या लागतात. ती एक शक्ती आहे , प्रचंड ऊर्जेची !!
 स्त्री च्या जन्माच्या तीन अवस्था आहेत बालपण , तारुण्य  (माहेरी आणि सासरी ) वृद्धावस्था. 
बालपण अगदी  मोहक असते मुलींचे सर्व जण लाड करतात होंशी पुरवतात  कारण त्यांना माहित असते एक दिवस हिला सासरी जायचे आहे हि कल्पना जेव्हा मुलीला अवगत होते ना तेव्हाच तिची परीक्षा सुरु होते आणि प्रवास सुरु होतो तारुण्याचा ज्यात तिच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवले जाते तिच्या हसण्या ,बोलण्यावर, वागण्यावर  सुद्धा बंधन यायला  लागतात , मग तिच्या लग्नाचा विषय घरात होऊ लागतो , अगदी जीवापाड जपणारे वडील सुद्धा जेव्हा लग्नाचे विचार येतात , मनावर जड ओझे घेऊन लग्न लावून देतात त्यात हि हि शक्ती अगदी हसत हसत मनातील दुःख लपवत सर्वकाही निमूटपणे सहन करते . आणि आई वडिलांचा विचार करत दिलेल्या घरी आपल्या नेहमीच्या सवयीच्या विरुद्ध असलेल्या घरालाही आपलेसे मनात नवीन संसार सुरु करते त्यातहि तिला बऱ्याच परीक्षा  द्याव्या लागतात.. मग तिचा पूर्णत्वाच्या प्रवास सुरु होतो , जेव्हा तिला आई होण्याची चाहूल लागते, मरण यातना सहूनही हि माऊली आपल्या जिवाच्या तुकड्यासाठी अगदी खंबीरपणे उभी राहते . 
मला खरंच आजही तो दिवस आठवतो ज्या दिवशी माझी मुलगी जन्माला आली , माझ्यात साधं उभे राहण्या एवढे बळ नसतानाही कस मी पाळण्यातून तिला हृदयाशी घेऊन बसलेली , त्या दिवशी समजले आपले मूल हि फक्त आपलीच जबाबदारी असते आणि त्यांना सांभाळणे , संस्कारित करणे , शिकवणे हेही आपलेच  कर्तव्यं आहे  मग त्यांच्या बऱ्याच परीक्षा ह्या आपल्याच होऊन बसतात आणि त्यांच्या वरच टेन्शन आपणच घेत बसतो. 
जस जस वय वाढत तस तस नवरा सुद्धा लहान मुलांसारखा वागायला लागतो , त्याचे हि प्रश्न सोडवणे या माऊलीला अगदी सहज जमते
उतारवयात हि नवऱ्याची सेवा सुश्रुषा करण्याचे काम हि स्वतःच आपल्या खांद्यावर घेते. स्वतःच्या शेवटच्या क्षणापर्यंत परीक्षा देतच असते. 
मनाचा मुजरा समस्त "स्त्रियांसाठी / आईसाठी " 

तु ग दुर्गा, तू भवानी , संसाराची तुच जननी , सारी माया तुझी , अंबे कृपा करी अंबे कृपा करी...... 

तुमचीच सखी 
"माझे पान"