मोकळा श्वास .......!

मोकळा श्वास .......! मैत्रिणींसाठी हक्काचं व्यासपीठ.

Thursday 7 March 2019

महिला संत- संत वेणाबाई


        'जय जय रघुवीर समर्थ' ही आरोळी ऐकून एक बारा-तेरा वर्षांची मुलगी समर्थ रामदासस्वामींसमोर आली.
''आपण माझ्याकडून भिक्षा घ्याल ना ?"
हा प्रश्न ऐकून आणि त्या मुलीकडे पाहून समर्थ काय समजायचे ते समजले आणि म्हणाले,"का नाही घेणार ? जरूर घेईन.."
ती मुलगी धावतच आत गेली आणि भिक्षा घेऊन आली. तिच्यापाठोपाठ एक मध्यमवयीन स्त्री पण बाहेर आली. दोघींनी समर्थांना
नमस्कार केला. समर्थ पुढे निघून गेले.
            ही बारा-तेरा वर्षांची मुलगी म्हणजे कोल्हापूरच्या राधाबाई व गोपजीपंत गोसावी यांची मुलगी....वेणाताई. हिचे लग्न मिरजेच्या देशपांडे यांच्या मुलाबरोबर झाले. पण संसार म्हणजे काय ? हे कळायच्या आतच काळाने तिच्या नवऱ्यावर झडप घातली. आणि वेणाताई बालविधवा झाली.
          त्याकाळी एकंदर स्त्रीजीवनच अवघड होते. कारण परकीय सत्ता, परकीय आक्रमण यांच्यामुळे स्त्रियांवर अनेक बंधने होती. आणि ती बंधने योग्यही होती. त्यातून बालविधवा म्हणजे तर बंधनांचे पाश अजूनच घट्ट आवळले जात. घरचाच काय, पण स्वयंपाकघराचा उंबरठाही ओलांडण्याची त्यांना परवानगी नसे. अशा परिस्थितीत वेणाबाई अडकली.
            अशीच एकदा तुळशीवृंदावनाजवळ एकनाथी भागवत वाचत बसलेली असतांना समर्थांची हाक ऐकू आली. तिने भिक्षा घातली. पायावर डोके ठेवले. घरातून सासू आली. तिने समर्थांना आपली व्यथा सांगितली. समर्थांनी वेणाबाईंना 'काय वाचतेस ?' असे विचारले. तिने 'एकनाथी भागवत वाचते,' असे सांगितले. समर्थांनी 'वाचतेस ते समजते का ?' असे विचारले. तेव्हा वेणाबाईंनी  समर्थांना वाचनातील जे समजले नव्हते, त्याबद्दल काही प्रश्न विचारले.  समर्थांनी त्यांची उत्तरे सांगितली. त्यांचे ज्ञान, वक्तृत्व यांनी वेणाबाई प्रभावित झाल्या. त्यांनी समर्थांना आपले गुरु मानले.
        पुढे वेणाबाईंना त्यांच्या सासरच्यांनी त्यांच्या माहेरी आणून सोडले. गोसावी हे समर्थांचे अनुग्रहित होते.त्यामुळे त्यांच्या कीर्तनाला ते जात असत. सोबत वेणाबाईही जात असत. समर्थांचे मार्गदर्शन वेणाबाईंना जीवनाचा मार्ग दाखवणारे ठरले. निराश आयुष्याला रामरायाच्या रूपाने आशेचा किरण दिसला.
        पुढे आईवडिलांनी विचार करून वेणाबाईंना समर्थांकडे सोपवण्याचा निर्णय घेतला.


देह माझे मन माझे। 
सर्व नेले गुरुराजे।। 

अशी अवस्था वेणाबाईंची होती. त्यात आईवडिलांच्या निर्णयाने त्या सुखावल्या.

       समर्थ रामदासांनी वेणाबाईंची अध्यात्मिक आवड, बोलण्याची शैली हे पाहून त्यांच्याकडून अध्यात्मिक अभ्यास करून घेतला. त्याकाळी समर्थांकडे अशा तीन बालविधवा, पण कर्तृत्ववान अशा तीन स्त्रिया होत्या. एक अक्काबाई , अंबिकाबाई आणि वेणाबाई यांच्याकडून समर्थांनी अध्यात्मिक अभ्यास करून घेऊन त्यांना मठाधिपती नेमले.
          त्यात मिरजेच्या मठाची जबादारी वेणाबाईंवर होती. शिवाय चाफळच्या रामनवमीच्या उत्सवाची जबादारी वेणाबाईंवर होती. वेणाबाईचा आवाजही चांगला होता. त्यांच्या अंगीचे हे गुण जाणून समर्थांनी त्यांना कीर्तन कसे करावे हे शिकवले. एकदा समर्थ त्यांना म्हणाले "आज येणाऱ्या भाविकांसमोर तुम्ही कीर्तन करा." वेणाबाई घाबरल्या. कारण विधवा स्त्रीने कीर्तन करणे अशुभ मानले जाई. तिचे दर्शनच अशुभ, तिथे तिचे कीर्तन कोण ऐकणार? पण समर्थांनी त्यांना कीर्तन करण्याची आज्ञा दिली. नाईलाजाने त्या कीर्तनाला उभ्या राहिल्या. स्वतः स्वामी कीर्तन ऐकायला येऊन बसले. वेणाबाईंचे डोळे पाणावले, पण स्वतःला सावरून त्यांनी उत्तम कीर्तन केले. समर्थ खुश झाले. पण समाजकंटकाना हे रुचले नाही. त्यांनी संधीचा फायदा घेऊन वेणाबाईंवर विषप्रयोग केला,पण त्या तेही पचवून उभ्या राहिल्या. त्यांची ही खंबीर मनोवृत्ती पाहून समर्थांनी शिष्येची पाठ थोपटली.

           वेणाबाईंनी अनेक ग्रंथरचना केल्या. त्यात 'उपदेशरहस्य', 'पंचीकरण', 'रामगुहक संवाद', 'रामायणाची कांडे', 'सीतास्वयंवर' तसेच काही अभंगपदे यांच्या रचना केल्या. वेणाबाईंवर समर्थांच्या लिखाणाचा प्रभाव असल्याने ही काव्ये तशीच  यमक प्रधान  आहेत.
           वेणाबाईंवर चाफळच्या रामनवमीच्या  उत्सवाची जबाबदारी असे. एकदा या उत्सवाच्या आधी पंधरा दिवस वेणाबाईंना खूप ताप आला. सर्व कामे खोळंबली. धान्य निवडणे, लोणची, पापड यांची व्यवस्था पाहणे... ही काहीही कामे होईनात. तापामुळे अंगात उभं राहायचीही ताकद नव्हती. तेव्हा शिष्याना सांगून रामापुढे स्वतःला खांबाला बांधून घेऊन त्या रामाची करुणा भाकू लागल्या.


पतित पावन जानकी जीवना 
अरविंदनयना रामराया... ll
अक्का गावा गेली, मज व्यथा झाली 
दयाळा राहीली नवमी तुझी...ll
आक्का गावा जाता, ऐका सीताकांता ll
वेणीच्या आकांता पावा वेगी ll
नवमी समारंभ पाहू द्या बरवा,
मग देह राघवा, जावो-राहो ll

ही करुणा इतकी आर्ततेत त्या म्हणत होत्या की,


ऐकुनी करुणा अयोध्येचा राणा,
मूर्तीच्या नयना अश्रू आले ll
ऐकुनी वचन पतित पावन,
कृपेसी पात्र वेणी केली ll

त्यांची करुणा ऐकून रामाच्या मूर्तीच्या डोळ्यांतून अश्रुधारा येऊ लागल्या. रघुपतीच्या गळ्यातील माळ वेणाबाईंच्या गळ्यात पडली. समर्थ हे सारे पहात होते. ते वेणाबाईंना म्हणाले, "देहाच्या ममतेस्तव देवाला संकटात का घालतेस ?"
वेणा उत्तरली," उत्सवात अडथळा नको म्हणून.... देहाचा मोह नाही."
          या दरम्यान रामबाई नावाची एक बाई वेणाबाईंच्या मदतीला आली. ती 'बत्तीस शिराळ्याहून समर्थांनी मला पाठवले,' असं म्हणाली. तिने सर्व तयारी केली. समर्थ आले. त्यांनी सांगितले की, "मी असं कुणालाही पाठवले नाही,"
           त्या रामबाईचा शोध घेतला, तेव्हा ती सापडली नाही. सगळेजण काय समजायचे ते समजले.
           वेणाबाईंना आता पैलतीर दिसत होता. समर्थ चाफळला आले आहेत, हे कळल्यावर त्या मिरजेहून चाफळला आल्या. त्यांनी समर्थांना विनंती केली,"मला आता आज्ञा द्यावी," पण समर्थ टाळाटाळ करत होते. रोज वेणाबाईंचा एकच धोसरा,"स्वामी मला आज्ञा द्या,"
           एके दिवशी समर्थ म्हणाले, "ठीक आहे, आज निरोप देऊ. समर्थांनी शिष्याना सांगून वेणाबाईंचे जेवणाचे पान आपल्या पानाच्या बाजूला मांडले. चार वाजता वेणाबाई कीर्तनाला उभ्या राहिल्या. समर्थांसह सर्वजण देहभान हरपून ऐकत होते. कीर्तन झाले, आरती झाली. वेणाबाईंनी समर्थांच्या पायावर मस्तक ठेवले.
         तेव्हा समर्थ म्हणाले,"आता माहेराला जावे," हे शब्द कानी पडताच 'जय जय रघुवीर समर्थ... सद्गुरू महाराज की जय...' असं म्हणून वेणाबाई खाली कोसळल्या.
            वेणाबाईंची समाधी जिथे आहे, तिथे चंपकवृक्ष उगवला आहे. त्याची फुलं घेऊन समर्थ रामाची पूजा करत असत.
              धन्य त्या वेणाबाई !
स्त्रियांसाठी असलेली अतिशय अपमानकारक आणि प्रतिकूल परिस्थिती त्यांच्या नशिबात आली असली तरी भक्तिमार्गाने त्यांनी आपले जीवन कंठले. आणि नंतर आपल्या गुरूंची समर्थांची आज्ञा शिरसावंद्य मानून त्यांच्यासमोर देह ठेवला.

मनीषा भास्कर जोशी
औरंगाबाद 

No comments: