"अक्षदा पडल्या, सुनमुख झाले,..
झाली आता वरात ,अभिजीतरावांसोबत टाकते पहिले पाऊल घरात,.."
पंधरावर्षांपूर्वी टाकलेलं हे पाऊल ह्या सासुरवाडीतच इतकं रमले की माहेर असत ह्याची आठवण असली तरी खूप ओढ नाही राहिली ....
त्याला कारणही तसंच माहेरी बाबा कडक असल्यामुळे ह्यापेक्षा कोणी कडक असेल असं वाटलं नाही,.... माहेरी खानावळ असल्यामुळे 50 लोकांच्या स्वयंपाकाला न घाबरणार्या आम्ही सासरी 4 माणसाच्या स्वयंपाकाला घाबरायचं कारणच नाही,...प्रचंड संघर्ष केलेला असल्यामुळे सासरी डगमगलो नाही,....
सासुनी मायेने शिकवले घरचे रितीरिवाज,... आणि सासऱ्यानेही दिली कलेला उत्स्फूर्त दाद,....
ज्या सासूने 15 वर्ष हातात पेन धरला नाही तिनी लग्ना आधी मला चिट्ठी लिहिली होती,....
"घरात जे काही होईल ते या चार भिंतीत ठेव,, भांड्याला भांड लागणारच,....मिळालेल्या चटणी भाकरीत आपण सुखी राहू,...."
आईची भूमिका सासूने कधीच सुरू केली होती,....
मी माहेरी गेले तरी त्या म्हणायच्या "लवकर येत जा ग उभे वारे सुटतात ..."
इतकं प्रेम जिथे तिथे माहेर नकळत सासर झालं आणि सासर माहेर झालं,....
माहेर आजही आयुष्यात मिठासारखं आहे,....वर्षभरातली छोटीशी नमकीन भेट,....पण सासर मात्र सगळं आयुष्य व्यापून आहे कारण तिथे माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात माझ्यासाठी अतोनात प्रेम आहे,.....
कुणाला वाटेल काय ही बाई सासरातच रमली,...पण मला आजही वाटतं माझ्या मुलीलाही असच सासर मिळावं आणि माहेरचं स्थान तिच्या संसारातही मीठाप्रमाणे रहावं........
स्वप्ना