मोकळा श्वास .......!

मोकळा श्वास .......! मैत्रिणींसाठी हक्काचं व्यासपीठ.

Saturday 24 February 2018

स्त्री ही अन्नपूर्णा आहे


मनिषा  मुळे यांची  माजघराचे (स्वयंपाकघर ) बदलते स्वरूप . यावर अप्रतिम अशी ऑडिओ क्लिप . 


मनिषा  मुळे 
औरंगाबाद 

कालाय तस्मे नमः

  मला या गोष्टीचा नेहमी अभिमान आहे की, मी एका ग्रामीण संस्कृतीच्या एकत्र कुटुंबात जन्माला आले. हा अभिमान वाटण्याची अनेक कारणं आहेत. पण त्यातील एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे, माझ्यावर झालेले उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म... या उक्ति प्रमाणे सकस, पौष्टिक स्वयंपाक बनविणे आणि इतरांना खावू घालण्याचे संस्कार...

       माझा जन्म _ऐंशी च्या दशकातला..._ भल्या पहाटे कोंबड्याच्या बांगेने घरातील सर्व कर्ते पुरूष आणि स्त्रीया जाग्या व्हायच्या. पुरुष मंडळी गोठ्यात जावून जनावरांची शेण-घाण साफ-सफाई आणि दूध काढणे त्यांना चारा देणे ही कामे करायची तर इकडे घरात दिवसाची सुरुवात व्हायची ती सड़ा-सारवण, रांगोळी आणि सुचिर्भुत होवून स्वयंपाकाची तयारी करण्याने...

       सकाळचे सर्व विधी उरकुन स्वच्छ अंघोळ करून देवपूजा केली माझी आजी मग ताबा घ्यायची ती माजघराचा... 

तोपर्यंत माझी आई आणि सर्व काकू पण इतर कामे आवरून तयार होवून माजघरात जमा व्हायच्या आजीच्या पुढच्या सुचनांचे पालन करायला.

     मनुष्यच न्हवे तर पशू पक्षी तसेच या जगातील सर्व चल सजीवांची जगण्यासाठी एक जी गरजेची गोष्ट आहे ती म्हणजे अन्न. आणि ते मिळवण्यासाठीच सुरु असते ती त्यांची दिवसरात्र प्रचंड धडपड.

       आता एकदा आजीने माजघरात प्रवेश केला की कामांचे वाटप व्हायचे. माझी एक आत्या तिला ताज्या दह्याचे ताक बनविण्याचे काम आजी द्यायची. _त्यावेळी मिक्सर न्हवते_ आणि कुटुंबं पण छोटी नसायची त्यामुळे सर्व खाण्याच्या गोष्टी पण भरपूर लागायच्या. त्यामुळे एका मोठ्या भांड्यात ताजे दही घेवून ते भांडं माजघरातल्या एका खांबाला टेकवून एक दावं बांधलेल्या मोठ्या रवीने आत्या ताक घुसळू लागायची.

        एक काकू आमच्या वाड्याच्या मागील शेतातून ताजी आणि हिरवीगार भाजी काढून ती स्वच्छ धुवून निवडायला घ्यायची.

       दूसरी काकू जात्यावर गहू, ज्वारी दळायला घ्यायची आणि तयार पीठ माझी आई मळायला घ्यायची. गम्मत नाही किंवा खोटे सांगत नाही पण त्यावेळी आमच्या घरी एका वेळी चपाती असो की भाकरी तीन शेराच्या लागायच्या. (आता जेंव्हा मी दोन वेळेच्या मिळून बारा चपात्या करते तेंव्हा लक्षात येतं की चुलीच्या धुराने डोळे जळजळत असताना देखील तीन शेर पिठाच्या भाकरी करणे म्हणजे काही खायचे काम न्हवे). तिसरी काकू एक शेर मक्याच्या  कण्या आणि एक शेराचा भात शिजवायला ठेवून निवडलेली भाजी चिरणे, कांडा-कुटायची कामे करायची. मग आई चपाती/भाकरी करायची आणि आजी मातीच्या भांड्यांमधे भाज्या बनवायला घ्यायची. कारण घरात बायकांमधे ती सर्वात मोठी होती आणि त्यामुळे तिला सर्वांच्या आवडी-निवड़ी आणि चवींबद्दल सगळे काही माहीत होते. आणि ती नेहमी म्हणायची, "कुणाच्या मनात बसायचं असेल तर आधी त्याच्या पोटात शिरलं पाहिजे पण फक्त म्हणण्या पुरतेच नाही तर खरंच तीने बनवलेला स्वयंपाकातील प्रत्येक पदार्थ हा खाणाऱ्याला तृप्त करून त्याचं मन जिंकायचा.

      आणि मग त्या ताक घुसळीच्या, कांडया-कुट्याच्या आवाजाने आणि तयार स्वयंपाकाच्या घर भरून टाकणाऱ्या सुगंधाने आम्ही बच्चे कंपनी जागे व्हायचो. कसेबसे मीठाने आणि करंजाच्या काडीने दात घासुन गडबड़ीने अंघोळ करायचो की तुटून पडायचो त्या खमंग आणि रुचकर खाण्यावार...

     कालांतराने आजी गेली आणि माजघराची जबाबदारी सर्वस्वी आईकड़े आली. कारण आता ती जेष्ठ आणि सर्वांच्या आवडी-निवड़ी जानणारी होती.

तिनेही तब्बल तीन दशकं ही जबाबदारी लीलया पेलली. या काळात माझं लग्न झालं. मी सासरी आले. तिकडे जगण्यातल्या सोइस्कर गरजा म्हणून सर्व काका वेगळे राहु लागले होते. मी तर मुळातच छोट्या शहरी कुटुंबात आले होते. आणि मग सुरु झाला होता एकाचवेळी माझा आणि आईचा माजघराकडून छोट्या किचन  कड़े प्रवास...

      पण काळ बदल हा निसर्गाचा नियम आहे या नुसार बदलला होता. आता माझ्या या छोटयाश्या किचन  मधे ताक घुसळायच्या रवीची आणि मोठ्या भांड्याची जागा छोट्या विजेवर चालणाऱ्या रवीने ( blender)ने घेतली. उखळाच्या जागी स्वयंचलित मिश्रकाने ( Mixer) घेतली. आणि चुल जावून गॅस शेगड़ी आल्याने आपसुकच जेवण बनवायला लागणारा गॅस आणि वेळ वाचवण्यासाठी मातीची आणि कल्हई केलेली जाड़ पितळेची भांडी जावून पातळ स्टेनलेस स्टील ची भांडी आली.

     यापुढे जावून आत्ता तर विजेवर चालणाऱ्या स्वयंचलित शेगड्या आणि उपकरणांची आता रेलचेल सुरु झाली आहे.

     जग आता वेगवान आणि धावपळीचे झाले आहे त्यामुळे हल्ली माजघराचे आधीच किचन झालेल्या घरातील निर्भेळ पाचक अन्नाची जागा हॉटेल आणि रेस्टॉरंट्स मधील फ़ास्ट फ़ूड ने घेतली. आणि माझ्या जगण्यामधे एक नीरसता आली. मी सतत नाराज राहु लागले. कारण जरी आजकाल लग्न आणि नोकारीसाठी लागणाऱ्या स्वयंमाहितीपत्रकामधे ( Bio-Data) फक्त एक छंद म्हणून लिहला जाणारा म्हणून स्वयंपाक माझ्या आजीने व आईने कधीच केला नाही आणि तेच संस्कार पीढ़ीजात चालत माझ्याकडे आलेले. त्यामुळे स्वयंपाक करणे हे फक्त छंद किंवा काम नव्हे तर माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य अंग आहे.

मला दिवसभर  कितीही काम असले तरीही कामावर जाण्याआधी आणि कामावरून आल्यावर स्वयंपाक करायचा कधीच कंटाळा येत नाही. पण खाणारे खवय्ये नसतील तर बनवण्याचा काय उपयोग?
पण काल एक चमत्कार झाला. माझा एकुलता एक मुलगा नेहमीप्रमाणे रात्री उशिरा घरी आला. आता हे गृहितकच झाले होते की, तो उशिरा घरी आला की बाहेरून जेवूनच येतो. आणि घरात तयार केलेले जेवण दुसऱ्या दिवशी सकाळी कोणाला तरी देवून टाकावे लागते. पण माझं आईचं काळीज ना त्यामुळे तो घरी जेवू अगर ना जेवू मी रोज त्याच्यासाठी काहीतरी नवीन पदार्थ आणि जेवण बनवुनच ठेवते.

आणि आज घरी येताच त्याने मला चक्क दारातूनच हाक दिली, आई ए आई मला लवकर जेवायला वाढ फार भूक लाग़लीय... मला तर धक्काच् बसला... काय घडतंय हे??? पण या धक्यातून सावरत मी पटकन किचेन मधे गेले आणि जेवण गरम करून वाढायला घेतले.

       तो हातपाय धुवून जेवायला बसला आणि माझ्या हातचे जेवण कौतुक करत अगदी आनंदाने जेवत होता. मला तर भरून आले. आणि न राहवुन मी त्याला प्रश्न विचारला, "बाळा हे जेवण तर मी रोज बनवते, आणि असेच बनवते, मग तुला अचानक आजंच एवढे कसे काय आवडले?" आणि त्याचे खाण्यावरचे लक्ष माझ्याकडे गेले. त्याने तसाच उष्ट्या हाताने माझा हात हातात घेतला आणि म्हणाला,"आई आत्ताच एक सिनेमा बघुन आलो आणि मला समजले की तू जेंव्हा एखादा पदार्थ बनवतेस तेंव्हा त्यात फक्त काही वस्तु आणि मसाले घालत नाहीस तर त्यात तू तुझा जीव ओततेस! आणि प्रेमाने आम्हाला खावु घालतेस. 

खरंच आज माझ्या जीवनाचे आणि जेवणाचे सार्थक झाले होते. मी भरून पावले. आणि मी माझ्या विचारात बूडन गेले , घरातले "माजघर" असो किंवा "स्वयंपाक घर" किंवा "लहानसे किचन " स्वयंपाक बनवणारी "स्त्री" असो किंवा "पुरुष" त्याची फक्त स्वयंपाक बनवण्याची वृत्ती निर्मळ आणि स्वयंपाक बनविणे हे आद्य कर्तव्य  समजणारी असावी लागते. मग आपोआपच पदार्थ चवदार होतात, व बनवणाऱ्याला आणि खाणाऱ्याला त्याचा निर्भेळ आनंद मिळतो!

     एवढयात् हाक ऐकू आली, "आई अगं कुठे हरवलीस? जेवण झालं माझं. काही छानसं डेज़र्ट असेल तर दे ना खायला..." आणि मग मघाशीच बनवलेले ताजे गुलाबजाम मी त्याला खायला दिले आणि त्याने लहान मुलासारखे मिटक्या मारत मारत खाल्ले...

धन्यवाद!

सौ. स्नेहल संजय वायचळ,
 पुणे.

चुल बोळकी.......!

चुल बोळकी इवलीशी ती,
आजही खुणवत असते मला...
अद्भुत या तंत्रज्ञानाने,,
हरवून टाकलंय बालपणाला....

                  ☺️स्वप्ना

स्वयंपाक करतांना खूप टेन्शन

मी लहान असल्यापासून स्वयंपाकापासून लांब राहायचे, 

अगदी जेवणहि असं फार मनापासून अगदी चवीने खाण्यासाठी 

आईला काही करायला सांगावे आणि खावे असे कधीच 

झाल्याचे मला आठवत नाही.लहान असल्या पासून फक्त फक्त 

अभ्यास यातच लक्ष असल्यामुळे इतर काम आणि स्वयंपाक कडे 

अगदी दुर्लक्ष ... 🤔


त्यातच काही मानसिक तयारी नसतानाच माझे लग्नही 

GRADUATION करतानाच झाले,😇👰

 नशिबाने नवरा जास्त जिभेचे लाड पुरवून घेणारा नाही म्हणून बरे झाले,🤗 

नाही तर बस्स माझं काही खर नव्हते. मला फक्त पुरणपोळी करता 

यायची,बाकी भाज्या कश्या करायच्या याची ट्रैनिंग बाकी होती. 

आईने सांगितलेले त्यांना जस आवडेल तसे बनवायचे. 

गम्मत म्हणजे मी नवीन नवरी असताना आम्ही जेव्हा पहिल्यांदा 

पुण्यात आले तेव्हा मला सुरुवातीला स्वयंपाक करतांना खूप टेन्शन 

यायचे काय करू कसे करू म्हणून ,पण माझे बरेच टेन्शन माझ्या 

ह्यांनीच दूर केले ते मला म्हणायचे सगळ्या भाज्यांना 

मिरची,लसूण,जिरे,मोहरी फोडणी द्यायची आणि करायची भाजी, 

अजून काय लागत एवढे असं म्हणून ह्यांनी माझा कॉन्फिडन्स वाढवला 

आणि मग मी छान स्वयंपाक शिकले.🤗


माझी मुले नवीन नवीन RECIPES आनंदाने खातात. एक मात्र आहे.

रोजचे नेहमीचे जेवण करायला मात्र थोडे नाक मुरडतात.

 ( शेवटी काय माझीच मुले ती ..)


खर सांगू का ? जर ह्यांनी मला समजून सांभाळून घेतले नसते तर ..... 

विचार हि करवत नाही माझं काय झाले असते. 

असो आता तरी मला बऱ्याच  छान छान पाककला येतात, 

पण काय आहे ना ! नवऱ्याची मदत न घेता केल्यामुळे ते त्यां RECIPES 

ला नको त्या R&D म्हणतात.

तुमचीच सखी 

माझे पान  

Friday 23 February 2018

बदल हा निसर्गाचा नियम आहे.

स्वयंपाकघर हे नुसते नाव जरी तोंडावर आले तरी तेथील विविध प्रकारच्या चवी जिभेवर रेंगाळतात. मन एकदम प्रसन्न होते. स्वयंपाक घरावर पूर्ण ताबा घरातील स्त्रीचा असतो. मग ती ग्रहिणी असो किंवा नोकरदार ,,, प्रत्येक वस्तूवरून मायेने तिचा हात फिरतो. तिच्या सर्व कृतीतून कोणत्या ना कोणत्या वस्तु हाताळल्या जातात.
   सध्याचे स्वयंपाकघर हे पूर्वीचे माजघर म्हणून ओळखले जायचे. या माजघरामध्ये घरातील स्त्रीचा अधिकाधिक वेळ जात होता.सकाळी उठल्यापासून अगदी दळणकांडण तिची सुरुवात होत असे. पण या कामात गाणी म्हणजेच ओव्या गात गात ती दळण दळत असे. परिणामी मन रमत आणि कामाचा थकवा पण जाणवत नव्हता.अन्न शिजवण्यासाठी चुलीचा उपयोग केला जात होता. त्यावर शिजवलेले अन्न रुचकर आणि स्वादिष्ट लागत असे. फुंकणीने विस्तव तयार करून जो धूर घरात पसरे त्याला  वेगळा सुगंध असे. चुलीवरची भाकरी, पिठले आणि ठेचा ही सारी अमृत तुल्य वाटे .
लोणचे,तक्कू, विविध प्रकारच्या चटण्या यांनी एक कोपरा व्यापलेला असे. माळ्यावर लपवून काही गोष्टी ठेवल्या जात.माऊलीने तूप काढवण्यास काढले की त्याचा सुवास घरभर पसरायचा.इतकी सारी कामे असली तरी सदैव आनंदी आणि प्रसन्न अशी तिची प्रतिमा होती.मुळात माजघरातील सर्व वस्तूंचा ति पुरेपूर उपभोग घेत असे.
      सध्या सर्व परिस्थिति बदलली आहे. माजघराला फक्त स्वयंपाक घराचे स्वरूप आले आहे. ऐसपैस असलेले माजघर आता छोटेसे किचन बनले. जागे अभावी कामापुरत्या वस्तूंनी जागा घेतल्या. जात्या ऐवजी मिक्सर आले. स्विच ऑन केले की दोन मिनिटात पीठ तयार. चुलीला गॅसचा पर्याय आला. खूप कमी वेळेत अन्न शिजू लागले. प्रेशर कुकर ची शिट्टी झाली की वरण भात तयार पाहिजे तेव्हा, पाहिजे त्या चटण्या आणि लोणचे उपलब्ध झाल्याने स्त्रीचा वेळ वाचतोय .
     बदल हा निसर्गाचा नियम आहे. प्रत्येक परिस्थितीत गतीमानता असणे आवश्यक आहे.तर आणि तरच सुधारणा होण्यास मदत होते.म्हणूनच पूर्वीचे जाते,खलबत्ता,उखळ आणि चूल या सार्‍यांची जागा सुधारित वस्तूंनी म्हणजेच बदलत्या स्वरुपात घेतल्या आहेत. या बद्लामुळे वेळेची मोठ्या प्रमाणावर बचत होऊ लागली. मिळालेला रिकामा वेळ स्त्रीला आपल्या स्वतःसाठी देता येऊ लागला.वस्तु आधीच्याच पण बदलत्या स्वरुपामुळे घरातील स्त्रीमधे प्रगति होत गेली.फक्त चूल आणि मूल एवढीच संकल्पना आजच्या स्त्रीची राहिली नसून घरातील सर्व जबाबदारी सांभाळून इतर जोखमीची कामे करणार्‍या महिला दिसतात याचे एकमेव कारण माजघरातील वस्तूंचे बदलते स्वरूप होय.
 आजच्या स्थितीत फक्त चूल आणि मूल एवढीच संकल्पना आजच्या स्त्रीची राहिलेली नसून पुढारीत आणि शिक्षित घडली आहे. वस्तूंच्या बदलत्या स्वरूपाने हे सहज शक्य झाले आहे.

शिवांगी विजय कुलकर्णी
    संभाजीनगर                                                    


माजघर हे तीचं साम्राज्य


अपर्णा मानोलीकर ( जहागिरदार )
परभणी 

जिच्या हाती पाळण्याची दोरी। ती जगाला उद्धारी।।


 खणखणीत अशा आवाजात मनिषा  मुळे यांची  '' जन्मताच मुली असुरक्षित का?'' यावर अप्रतिम अशी ऑडिओ क्लिप . 
सगळ्यांनी आवर्जून ऐकावी. 


मनिषा  मुळे 

औरंगाबाद 

Saturday 17 February 2018

मुलगी जणू संस्कारच व्यासपीठ !


जरुर ऐका !

माधवी शहाणे यांची जन्मताच मुली असुरक्षित का?  या विषयावरील ऑडिओ क्लिप. 

माधवी शहाणे 
औरंगाबाद

स्वतःचे संरक्षण स्वतःच करायचे .

दिल्लीतील ८ महिन्याच्या मुलीवर रेप हि घटना मनाला चटका लावून गेली . आणि जन्मताच मुली असुरक्षित का ? असं वाटायला लागलं. पूर्वीच्या काळी मुलीचा गर्भ  वाढतोय असे कळले तर गर्भ काढण्यात येत असे, हुंडा द्यावा लागतो म्हणून  मुलीचा जन्म नको वाटायचं, कधी घरच्यांच्या दबावा मुळे मुलीचा जन्म नाकारण्यात यायचा.  पण आता मुलगी जन्मायच्या आधीच  माझ्या मुलीवर रेप तर होणार नाही ना ?  अशी भीती वाटायला लागली आहे. यामुळे मुलींच्या जन्मदर कमी होण्यास काहीच वेळ लागणार नाही.

काही घटना अशा आहेत कि  शाळा, कॉलेज, क्लासेसचा रस्ताही आता मुलींसाठी सुरक्षित राहिला नाही असेच  म्हणावे लागेल. वर्तमानपत्र वाचायला घेतले की, हल्ली याच बातम्या जास्त असतात. आजकाल माध्यमांच्या अति खुलेपणामुळे, अतिरंजीत चित्रपट, मालिका यांचे प्रक्षेपण यांचा प्रभाव लोकांवर होत असल्यामुळे, अशा घटनांना मोकळीक मिळत आहे.

खूप दिवसांपूर्वी एक जाहिरात खूप प्रसिद्ध झाली होती. आई पाहिजे, पत्नी पाहिजे, बहीण पाहिजे , मग ....... मुलगी का नको ? पण आता अशी वेळ आली आहे कि घरात मुलगा आणि मुलगी दोघेही पाहिजेत. मुलीला आणि मुलाला समान  वागणूक  दिली गेली पाहिजे . म्हणजे यातून मुलगा मुलगी असा भेदभाव निर्माण होणार नाही.  दोघेही एकमेकांचा आदर करायचा शिकतील. हि सुरवात आधी घरापासून करणे आवश्यक आहे. 

मुली आणि महिलांविषयी आदरभावना मुलांच्या मनात निर्माण होण्यासाठी शाळा, समाज आणि कुटुंब या तिघांचीही जबाबदारी आहे. असे प्रसंग घडले तर कोणालाही न घाबरता शिक्षक, पालक समाज यांना सांगता यावा, ‘गुड टच, बॅड टच ‘ या विषयी माहिती मुलांना घरातून  शाळेतून देण्यात यावी तेही कोणतीही लाज न बाळगता. असे समुपदेशन प्रत्येक पालकांना सुद्धा करणे गरजेचे आहे. आणि शाळेत सुद्धा घेणे गरजेचे आहे. सुरक्षितता हा प्रत्येक मुला मुलीचा अधिकार आहे, कोणालाही  त्यांचे सुंदर आयुष्य विस्कटुन  टाकण्याचा किंवा त्यांचे जीवन अंधःकारमय करण्याचा हक्क नाही.


चला तर मग मुलांना स्वतःचे संरक्षण स्वतःच करायचे शिकवुया आणि समाजाच्या विकृत गुन्हेगारी पासून दूर ठेवूया.

सीमा लिंगायत कुलकर्णी

पुणे

पॉसिटीव्ह च बोलले पाहिजे

"जन्मताच मुली असुरक्षित" विषयचा  विचार येताच मनात वेगवेगळे विचार येऊ लागतात ,
 खरंआहोत का आपण हि सुरक्षित ?
नेमका थोड्या दिवसाआधी  " पद्मावत " बघितला तेव्हा विचारांचे काहूर पेटले डोक्यात,
खरंच आहोत का आपणही सुरक्षित ?

किती वेळ लागतो आपल्याला नेगेटिव्ह विचार करायला अगदी क्षणभर हि नाही लगेच
वारे वाहू लागतात नेगेटिव्हिटीचे , त्यामुळे मनावर ताबा ठेवून थोडे प्रॅक्टिकली विचार करून
जेव्हा विचार करू तेव्हा आपण आपल्या समस्या सोडवू शकू . 
नेमके काय आहे "स्री "ना आपण मुळातच  खूप हळवी असते त्यामुळे तिला तिच्या
भावना लगेच मांडता येत नाहीत मात्र तिच्या डोळ्यातून तिला काय वाटले हे लगेच कळते .
पुरुषप्रधान संस्कृतीत आपण राहत आहोत , कितीही स्त्री वर्ग पुढे आला असला तरी समाजात
 वावरतांना आपण आपल्या मर्यादा सांभाळूनच राहावे .आपल्या घरापासूनच सुरुवात करावी
मुलामुलींना सारखीच वागणूक द्यावी 

मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे . दोघांचेही अगदी वेगवेगळे स्वभाव , सवयी आहेत. 
आम्ही दोघांनाही सारखेच लाड करतो ,पण मुलीची जरा जास्तच काळजी घेतो हे मलाही वाटते .
 खरंच एवढे बिनधास्त मी तरी माझ्या मुलीला सोडेल असे मला वाटत नाही ,
नक्कीच अजून लहान आहेत दोघेही पण वेळ आल्यावर दोघानाही समजवून सांगणे गरजेचे आहे .
 कितीही मोर्डेन विचार आपण ठेवले तरी आपली "मुले " हि आपली जबाबदारी आहेत,
त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे हे आपले कर्त्यव्य आहे आणि जगाची ओळख त्यांना
आपल्या विचारातून होत असते , त्यामुळे आपण पॉसिटीव्ह च बोलले पाहिजे आतापासून
त्यांना भ्रमिष्ट न करता ,त्यांना काय योग्य काय अयोग्य याचे शिक्षण  द्यायलाच हवे. 
मुलापेक्षा मुली ह्या खूप जिवाच्या आत असतात हे मात्र नक्की , त्यामुळे त्याची काळजी करणे ,
सुरक्षितता  पाहणे हेही साहजिकच.
तुमचीच सखी 
माझे पान  

मूल सुरक्षित आहे का ?



राजश्री कुलकर्णी यांचे '' जन्मताच मुली असुरक्षित का?'' यावर अप्रतिम अशी ऑडिओ क्लिप . 
सगळ्यांनी आवर्जून ऐकावी. 

राजश्री कुलकर्णी 
औरंगाबाद

थोडं बिनधास्त थोडं धडाडीने !

एका पुस्तकात वाचलं होतं....आपल्या विचारानुसार आपल्या भोवती व्हेवज निर्माण होतात आणि,,,आणि घटना घडत राहतात त्यामुळे पॉझिटिव्ह विचार करा,,,,

       मला पटली ही गोष्ट आणि मी ती आत्मसात केली,,, हे ह्या विषयात सांगण्याचं कारण की रस्त्यावर चालताना काहीही होऊ शकतं तरी आपण काळजी घेऊन चालावं अस असलं तरी कुठेतरी काहीतरी घडतच पण म्हणून आपण रस्त्यावर चालणं सोडून देतो का हो?,,,, नाही ना.....मग हेच दोन्ही धोरण आपण मुली मोठया करताना बाळगू यात ना,,,कारण कस आहे आई गर्भ राहिल्यापासून निगेटिव्ह विचार करते मुलगी झाली तर कस होईल?कसं सांभाळावे? जग इतकं वाईट आहे,,,,मुलींचं अवघडच आहे?

        अरे असे निगेटिव्ह विचार करून आपण तेच तेच वातावरण निर्माण करतोय,,,,,अगदीच नाही असं नाही आहेत काही गोष्टी पण म्हणून काय तेच डोक्यात ठेवून जन्म देणार का आपण त्यांना?,,,,,आणि वाढवणारही तसच आयुष्य स्ट्रेस मध्ये ठेवून,,,,,

     मला मुलगी आहे,, मला माझ्या नातेवाईकांच्या सूचना ती 3 वर्षाची असल्या पासून तिला सांग कुठे कुठे हात लावू  द्यायचा नाही,,,,,अहो हो अजून तिला तर धड हाता पायांची ओळख होऊ द्या,,,,, माझी एक बहीण अनिमेटेड व्हिडिओ पाहून त्यात मुलींना कसे हात लावतात ते दाखवून बेचैन,,,,,फार अवघड असत ग कुठे कोणाकडे पाठवायचं नाही त्यांना सूचना द्यायच्या,,,,,,

      अग मान्य हे सगळं पण त्यासाठी आयांनी असंच होत हेच जग आहे हे जरा डोक्यातून काढा ,,,थोडं बिनधास्त थोडं धडाडीने हे आधी स्वीकार ही एक बाजू आहे जगात पण पॉझिटिव्ह जगपण खूप छान आहे,,, जगणं खूप सुंदर आहे,,,,

         सुरक्षित पूर्ण नसल्या तरी असुरक्षितच आहेत असेही नाही,,

        आपणपण एक स्त्री म्हणून मोठं होतोय आपले अनुभव बघा,,, आता जरी वाईट गोष्टी वाढत असल्या तरी सुविधापण किती आहेत,, मोबाईल आहेत ट्रॅकर aap आहेत,, महिला कायदे आहेत,,, मी रोज 100 किलोमीटर प्रवास करून जाते,,,माझ्या स्टाफमध्ये एकही लेडी नाही पण ते स्वीकारून पॉझिटिव्हली जेव्हा घेते तेव्हा त्रास होत नाही,,,

       असुरक्षितता नाही असं नाही पण आपण ती मिठा सारखी स्वीकारू तीच प्रमाण आपल्या विचारांनी वाढू देऊ नका ....

       थोडं पॉझिटिव्ह पणे आयुष्य जगू यात आणि मुलींना वाढवू यात म्हणजे या पॉझिटिव्ह व्हेवज कदाचित वाईट वृत्तीना मोडीत काढतील ,,,आणि मग ह्या चिमण्या आनंदाने कुठलीही भीती न बाळगता उंच उडतील 
         
एका मुलीची आई
                  🙂स्वप्ना

Wednesday 14 February 2018

हवास तू......🌹

श्वास तू
ध्यास तू
जगण्याची माझी आस तू

सूर तू
ताल तू
श्वासांची माझ्या लय तू

शब्द तू
भावना तू
अंतरीचा माझा आवाज तू

श्रध्दा तू
भक्ती तू
मनमंदिरातील माझ्या परमेश्वर तू

स्वप्न तू
सत्य तू
सोनेरी क्षणांचा प्रत्येक किरण तू

आज तू
काल  तू
येणाऱ्या प्रत्येक क्षणाला मज संगे हवास तू
हवास तू......

🌹व्हैलेंटाइन स्पेशल🌹
🎈राजश्री प्रसाद कुलकर्णी🎈

Monday 12 February 2018

नांदेड औरंगाबाद valentine प्रवास 💗

 ऐका  मनिषा  मुळे यांनी valentine day वर केलेली व्हिडीओ  क्लिप 



मनिषा  मुळे 
औरंगाबाद 

💗 मनाचे पुस्तक उघडले 💗

माझा नवरा मला चिडवण्यात एक नंबर आहे,😄
मी त्याला सहज विचारले अहो तुम्हाला आपला पहिला valentine day  
आठवतोय का?😎
तर मला म्हणतात तरी कसे " आता हा कुठला मराठी सण आहे ?"
कपाळाला हातच मारून घेतला मी कि कुठून विचारले ह्यांना , 
तसे बघायला गेले तर खरंच आहे, हे आपला पहिल्या valentine day
 पेक्षा Anniversary लक्षात ठेऊ या ना मैत्रिणींनो.

माझे लग्न ११ फेब्रुवारी ला झाले माझ्या पहिल्या valentine day  ला माझ्या 
नवऱ्याने माझ्या समोर त्याच्या मनाचे पुस्तक उघडले आणि तेच माझे 
पहिले गिफ्ट आहे .😍
आता तुम्ही विचारणार त्यांनी तुम्हाला काय सांगितले तर ऐका " त्यांनी 
मला सांगितले कि त्यांचे एका मुलीवर खूप मनापासून प्रेम होते " पण 
आज मी तुला हेचं सगळे सांगू इच्छितो कि कारन आजपासून मी 
सर्वस्वी तुझाच झालो आणि तुझाच राहणार " बस्स त्या दिवशी पासून
आम्ही कधीही valentine day पेक्षा आमची Anniversary च साजरी करतो.😍 
माझ्या मते हेचं माझं  valentine day च "बेस्ट गिफ्ट आहे"
 थांबा थांबा मैत्रिणींनो  अजून एक गंमत  सांगायची राहिली , तसा माझा 
नवरा आहेच मुळी हुशार, म्हणतो कसा मला ...🤔
"कुठं आहे मग आपले first  anniversary गिफ्ट ? "
आता लग्नाला १३ वर्ष झालीत माझ्या आणि काय आहे न मला वस्तू  
मी कुठे ठेवते हेच ना कधी कधी आठवतच नाही . 😇
मग मला माझ्या first  anniversary ला मिळालेली घड्याळ कुठं
 ठेवली हेच आठवत नाही. 🤔
आणि माझे हे मला परत चिडवत बसलेत.... 😂😂
असो अशी आहे आमची कहाणी आवडली का तुम्हाला please कळवा. 
तुमचीच सखी, 
"माझे पान"  



Friday 9 February 2018

उमलले प्रेम 💗

 परवा जुन्या फाईल मध्ये आपलं पहिलं पत्र 📝 सापडलं,,....पहिल्या व्हॅलेंटाईनच💞 आणि जुन्या आठवणींनी ओठावर हसू 😊आलं,.....कारण माझ्या वेडूने त्याच वर्तमानपत्र📰 केलं होतं आधी ते हाती लागलं सासऱ्यांच्या, ....मग काय नुसती मजा पत्रातले फुगे 🎈छान हलके उडत होते आणि आमचे फुगे फुटले होते.........

         महिनाभरा पूर्वी उमलले प्रेम💗 आता घाबरत होतं😱,......पण त्या पत्राने वेगळीच जादू झाली माझं पत्र सासू सासऱ्यांनाच इतकं आवडलं की ते म्हणाले,"जिने समभाळलंय पत्रातील काव्य एवढं छान,.....तीला नक्कीच राहील संसाराचं भान,....🤗."मग काय पुढच्या व्हॅलेंटाइनला मी माझ्या राजाची राणी होते 💏
🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈

              स्वप्ना मुळे(मायी)
                  औरंगाबाद

Thursday 8 February 2018

व्हॅलेंटाईन वीक 💝 🌹

एखाद्या आईसाठी आपल्या मुलापेक्षा 👩‍👦 कोणता प्रेमळ व्हॅलेंटाईन 💖असू शकेल? नाहीना मग वाचा माझ्या व्हॅलेंटाईन डे ची गोष्ट. माझा पहिला, सुंदर आणि आयुष्यात कधीहि न विसरणार व्हॅलेंटाईन डे म्हणजे माझ्या मुलाचा जन्म 👶. तेव्हा आधी सगळे जोरात ओरडले हॅपी व्हॅलेंटाईन डे 💝. हॉस्पिटल मधील लोकांना काही कळलेच नाही. मग आम्ही त्यांना सांगितलं. माझ्या बाळाचा जन्म १० फेब्रुवारीचा 🎂 , १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे 💝 आणि त्याच्या आजोबांचा वाढदिवस १६ फेब्रुवारीचा 🎂 (तस पाहिलं तर १४ फेब्रुवारी पेक्षा जास्त २ दिवस आमच्या फॅमिली मध्ये व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन 🎊🎉🎁 होत असतो .). म्हणजे आम्ही घरातले सगळे १७ जण मिळून एक आठवडा व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन करत असतो .
आमचा खास स्पेशल व्यक्तीसाठी व्हॅलेंटाईन डे न राहता संपूर्ण फॅमिली👨‍👨‍👧‍👦 सोबत व्हॅलेंटाईन डे वीक सेलिब्रेशन ची परंपरा हि २०१० पासून चालू झाली ती अजून हि चालू आहे. म्हणजे आमच्या घरात व्हॅलेंटाईन डे ची सुरवात हि शेंडेफळ 👶 पासून सुरु होते. आणि व्हॅलेंटाईन डे चा शेवट हा त्याच्या आजोबांच्या 👴 वाढदिवशी होत असतो. मग त्याचे आजोबा हळूच आजीकडे बघून म्हणतात 'अभी तो मै जवान हू 💑 ' आणि आजी हळुच लाजते 😊.
व्हॅलेंटाईन डे फक्त प्रियकर-प्रेयसी किंवा पती-पत्नीत साजरा करणे असा नाही . तर याचा अर्थ व्यापक आहे. एक मुलगा आपल्या 70 वर्षे वयाच्या आजीलाही लाल गुलाब 🌹 देऊन, फॅमिली👨‍👨‍👧‍👦 सोबत आपला व्हॅलेंटाईन बनवू शकतो. व्हॅलेंटाईन म्हणजे ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम करतो अशी व्यक्ती. आपण डोळे बंद केल्यावरदेखील त्याचेच अस्तित्व आपल्या डोळ्यांसमोर तरंगत राहते. ज्याप्रमाणे मीरेने कोणत्याही स्वार्थाशिवाय कृष्णावर प्रेम केले त्याप्रमाणे. मित्रदेखील आपला व्हॅलेंटाईन होऊ शकतो. व्हॅलेंटाईनचा खरा अर्थ आहे कोणत्याही स्वार्थाशिवाय प्रेम.
चला तर मग माझ्या सगळ्या मित्र, मैत्रिणींना, नातेवाईकांना 💝हॅपी व्हॅलेंटाईन डे💝.

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

सीमा लिंगायत कुलकर्णी
पुणे

Saturday 3 February 2018

गॅझेट आणि मुले


























सध्याच्या काळात दूरदर्शन नाही असे घर सापडणे अवघडच. टीव्हीचे जसे
फायदे तसे तोटेही आहेत. विशेष करून लहान मुलांवर याचा जास्त परिणाम होतो.अगदी 2 वर्षाचे बाळ सुदधा सगळे काही समजत असल्यासारखे टीव्ही पाहतो.चित्रआणि आवाजामुळे तो पटकन त्याची नक्कल करतो. मागे एकदा छोटा भीममालिका चालू होती. छोटा भीम बघून मुलांना वाटायचे की लाडू खालला कीसगळ्यांना हारवता येते, खूप शक्ति येते, किती उडया मारले तरी लागत नाही .मोबाइल तर मुलांचे एक खेळणेच होऊन बसले आहे. किती सहजासहजी तेअप्प्स बदलतात, डाउनलोड करतात, प्ले गेम मध्ये जातात इत्यादी हे सर्व बघुन
खूप नवल वाटते, जसे काही त्याला पूर्ण वाचता येतय !!!

बाळाला गिफ्ट म्हणून एखादी रिमोट कंट्रोल ची गाडी दिली तर ताबडतोब पेपरफाडून वगैरे गाडी बाहेर निघते. रिमोटने गाडी चालवण्यात तो गुंग होऊन जातो आणि गाडी चालत नसेल तर तो उकलून पाहतो. टीव्ही, मोबाइल, लॅपटॉप,कम्प्युटर, गाडी तसेच इतर कोणतेही ईलोक्ट्रोनिक उपकरण असो, मुले त्यातपुर्णपणे रमून जातात .त्याला न खाण्याचे भान असते न झोपण्याचे ,,,,पालकांनी याची चिंता करणे जरूरी आहे,वास्तविक पाहता आपण इथेच खूपमोठी चूक करतो. त्याचे नको इतके कौतुक केल्या जाते .लाड करण्याच्या नादात वय विसरून जाऊन त्याने जे मागितले ते आपण देऊन टाकतो. मुलांना एका मर्‍यादे पर्यन्त ही साहित्य दिली पाहिजेत .

आजकालची मुले त्यांना खेळण्यास काही देत नाही तोपर्यंत जवळ सुध्धा येतनाहीत. चॉकलेट, कॅडबरी पेक्षाही मोबाइल जास्त प्रिय असतो. कितीच्या किती वेळते रमून जातात .

जसे जसे ते वापरत जातात तसतसे त्यांची क्षमता वाढण्यास मदत होते.
वेगवेगळी स्किल वापरू शकतो. बुध्दिमत्तेत वाढ होते . त्याच्या व्यक्तिमत्वातफरक पडतो.पाठांतर लवकर होते. इतरांचे संभाषण ऐकून ऐकून बाळाची भाषा सुधारते,सगळ्या सारखे तो कपडे मागतो.एकूणच प्रगति जास्त !!!!मुलांच्या ईलोक्ट्रानिक वापरावर आपणच बंधने घातली तर काही नुकसान नाही पण आई , वडील सतत कोणत्या न कोणत्या स्क्रीन वर बिझी असतील तर त्याचेअनुकरण मुले करतात , व्हाट्सअप,फेसबुक या आणि इतर माध्यमाचा उपयोग लहान मुलेही अगदी सर्रास करतात,म्हणूच बाळ काय करतय ,काय खेळ्तय तसेचकोणाबरोबर च्याटिंग करतो यावर घरातील मोठ्यांनी लक्षं ठेवले तर मुलांच्या प्रगतीत वाढ होते.

शिवांगी कुलकर्णी
औरंगाबाद 

मोबाइल माझा गुरू


एकविसाव्या शतकातील अख्खी पिढी ही टेक्नोलॉजिला अॅडीक्ट आहे. ही पिढी स्वत: ला गॅझेटमध्ये रमवून घेते. यात गेम्स, शैक्षणिक अॅप्स, म्युझिक आणि बरेच काहींचा समावेश आहे. 
आजच्या आर्इ (मम्मी) गरोदरपणी मुलांची घ्यायची काळजी, वजन कसे वाढवावे, काय खावे, काय प्यावे, किती वाजता झोपावे, कोणते व्यायाम करावे आदीं गोष्टींसाठी वेगवेगळ्या अॅप्सवर अवलंबून असतात. 
मुलं जन्माला आल्यावर मुलांची वाढ कशी करावी, त्यांना काय खायला द्यावे, त्यांच्या आजारपणात काय काळजी घ्यावी अश्या अनेक गोष्टींची माहिती अॅप्स घेतात. त्यामुळे पुढे ही मुलं थोडी मोठी झाली की, आर्इ- बाबांचा मोबाइल घेऊन लॉक उघडून वेग-वेगळी गेम्स खेळतात कारण घरात आर्इ- बाबा नोकरी करतात. तार्इ- दादा शाळेत जातात. आजी-अजोबा वृध्दाश्रमात असल्यामुळे या लहान मुलांचा मोबाइल हाच गुरू झाला आहे. 

लहान अवघ्या आठ महिन्याचे मुलं हे मोबाइल बालगीते पाहिल्याशिवाय जेवण करत नाही. तर काही मुलं बाहेर गेल्यावर आर्इ- बाबांना त्रास देतात म्हणून हा घे फोन आणि शांत बस असा सल्ला पालकच देतात. यात या मुलांची काही चुक नाही किंवा पालकांची सुध्दा काहींची नाही. हा बदल आहे तो येणा-या परिस्थितीचा. परंतू याकडे आपण सकारत्मकपणे पाहिले पाहिजे. 
अवघी दोन वर्षांची मुलं या अॅप्समुळे प्राणी, पक्षी ओळखू लागले. रंग- आकार समजू लागले. मराठी- इंग्रजी बाराखडी,
अंक गणित ऐकून म्हणू लागले. हा बदल चांगला आहे. या मुलांना काही सांगण्याची गरज नाही. ते आपले आपणच शिकू लागले आहेत. ही चांगली बाब आहे. काही अॅप्स असे आहेत की त्यात श्लोक, आरत्या, गोष्टी अश्या ब-याच गोष्टी एकत्रित समावेश केला आहे. त्यामुळे मुलं आता श्लोक म्हणू लागली आहेत. तसेच ऑडिओ बुकमुळे मुलांना आता पुस्तक ऐकण्याची सवय लागली आहे.
त्यामुळे आपणच याकडे दृष्टीकोन बदलून पाहणे आवश्यक आहे. ही बद्दलाची नांदी आहे. आगामी काळातील डिजिटल एज्युकेशनचे पाऊल पडते पुढे. त्यामुळे मुलं आता डिजिटल होऊन शिक्षण घेतील.

प्रतिक्षा परिचारक - पाठक
औरंगाबाद 

गॅझेट चा वेगळाच अर्थ.

पूर्वी रोजचा दिवस सुरु व्हायचा तो रेडियो किंवा वर्तमानपत्राने आणि संपत होता तो कुटुंबातल्या वेगवेगळ्या विषयांनी, पण आता रोजचा दिवस सुरू होतो इंटरनेटनं आणि संपतोही इंटरनेटनं ! इंटरनेटमुळे जग कसं जवळ आलंय ज्ञानाची गंगा उपलब्ध झाली आहे. पण आपल्यापैकी कितीजण या इंटरनेटच्या जाळ्यात अडकली आहेत हे पाहणंही फार गरजेचं झालंय. इंटरनेटच्या व्यसनामध्ये काही प्रकार आहेत ऑनलाइन गेम खेळणं, माहिती गोळा करत सुटणं, बाजारात येणारी नवनवी गॅजेट विकत घेत रहाणं आणि  लहान  मुलान  मध्ये प्रत्येक गॅजेट आपल्याकडे असायलाच हवं, असा अट्टहास असणं,

इलेक्‍ट्रॉनि गॅझेट चा अर्थ लहानसहान कामासांठी उपयोगी पडणारे साधन यंत्र असा होतो. पण हि बातमी वाचताना गॅझेट चा नवीन वेगळाच अर्थ समजतो, बडोद्यातील एका तेरा वर्षांच्या मुलीने स्वत:चे महागड्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स गॅझेट्‌सचे व्यसन पूर्ण करण्यासाठी चक्‍क वेश्‍याव्यवसायाचा मार्ग स्वीकारला. फार पूर्वीपासून महागडे मोबाईल, आयपॅड आणि लॅपटॉपचे आकर्षण होते. या मुलीची आई येथे एक बांगड्याचे दुकान चालविते. घरची कमाई फारच कमी असल्याने या मुलीला महागडे गॅझेट्‌स खरेदी करणे शक्‍य होत नव्हते. अखेर आपली हौस पूर्ण करण्यासाठी तिने वेश्‍याव्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. एका खासगी वापराच्या मोबाईलच्या माध्यमातून ही मुलगी विशिष्ट व्यक्‍तींशी संपर्क साधत आणि त्यांच्या माध्यमातून देहविक्रय करत असत. जेव्हा ती गर्भवती असल्याचे तिच्या आईला समजले तेव्हा हा सर्व प्रकार उघड झाला. हि बातमी मनाला चटका लाऊन गेली.

क्षणभर मी मागे गेले पूर्वी अन्न, वस्त्र, निवारा या  तीन  माणसांच्या  मुलभूत  गरजा  आहेत  अस  सागितलं  जायचं, त्यात बदल होऊन मग आरोग्य, शिक्षण समाविष्ट झाले. आता तरुणांच्या (५ ते १५  वयोगट) बाबतीत गॅझेटसुद्धा जीवनावश्‍यक गोष्टच बनली आहे. लहान मुलांमध्ये इलेक्‍ट्रॉनिक गॅझेट्‌सची क्रेझ इतकी वाढत आहे की ते एकलकोंडे होत आहेत आता याच व्यसनापायी त्यांची पावले भलत्याच दिशेला पडताना दिसत आहेत. देशाच्या महागरांमधील 5 ते 12 या वयोगटातील 82 टक्के मुलांकडे मोबाईल, टॅबलेट आणि "आयपॅड‘, अशी "गॅझेट्‌स‘ आहेत. "गॅझेट‘च्या अतिवापरामुळे मुलांमध्ये सामाजिक विजनवास, नैराश्‍य, निद्रानाश, चिंता, जाडेपणा, मानसिक अनारोग्य, अशा समस्या निर्माण होत आहेत, असे "ऍसॉचॅम‘च्या अहवालातून समोर आले आहे. 

जग झपाट्याने बदलतंय. त्यांना समजून घेण्यासाठी चौकटीच्या बाहेरचा विचार करण्याची गरज आहे. आपण त्यांच्या आजच्या काळातील गोष्टीत इंटरेस्ट दाखवला तर आनंदाने संवाद साधल्या जाईल. पैशाची किंमत त्यांना कळायला हवी त्यासाठी त्यांना विश्वासात घेऊन घरच्या आर्थिक परिस्थितीची माहिती द्यावी व त्यात त्यांना सहभागी करून घेतले तर, ते खूप हुशार आहेत त्यातून ते मार्गही सुचवतील. .सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांना ऐकाल तर ते तुम्हाला ऐकतील व सगळ्या विषयांवर मोकळेपणाने संवाद साधता येईल.


सीमा लिंगायत  कुलकर्णी
पुणे