मोकळा श्वास .......!

मोकळा श्वास .......! मैत्रिणींसाठी हक्काचं व्यासपीठ.

Friday, 8 March 2019

बहीण प्रेमाचा झरा - संत मुक्ताबाई

  
आज जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा होत आहे. त्यानिमित्ताने बहीण प्रेमाचा झरा देणाऱ्या संत मुक्तबाई यांच्या जीवनातील काही गोष्टीचा उलगडा पाहूया.

महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले त्यात पुरुष बरोबरीने महिला संतानीही समाज प्रबोधनात खूप मोठा हातभार लावला आहे. त्यात संत मुक्ताबाई यांचा उल्लेख करावा लागेल. संत मुक्ताबाई या महाराष्ट्रातील संत-कवयित्री होत्या. संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे त्यांचे थोरले भाऊ होते.

संत मुक्ताबाई ह्या संत ज्ञानेश्वरांच्या धाकट्या बहीण म्हणून सर्वांना परिचित आहेत. परंतु त्यांनी स्वतःचेही स्वतंत्र व्यक्तीमत्व निर्माण केले आहे. 
त्यांनी रचिलेले ''ताटीचे अभंग'' हे त्यांच्या नावावर नोंद झाली आहे. या अभंगांमध्ये त्यांनी संत ज्ञानेश्वरांना काही बोध दिला आहे. त्या योगी चांगदेवांच्या गुरू होत्या. त्यांनी ज्ञानबोध या ग्रंथाचेही लेखन केले आहे.  ह्या ग्रंथामध्ये संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई ह्यांचा संवाद आहे. त्या समाधिस्थ होण्याच्या थोडेसे आधी झालेले हे लिखाण असावे, असे त्यातील अंतर्गत संदर्भांवरून लक्षात येते.

त्यांचा जन्म शके ११९९ किंवा शके १२०१ मध्ये आश्विन शुद्ध प्रतिपदेला (घटस्थापना) झाला असा उल्लेख आहे. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा, मातापित्यांचा देहत्याग, ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईस दिलेली सनद, विसोबा खेचर यांचे शरण येणे हे त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग. शुद्धिपत्र मिळविण्यासाठी चौघे भावडं पैठण गावी आले. “ताटी उघडा ज्ञानेश्वरा” अशी आर्जव मुक्ताईने ज्ञानेश्वरांना केली होती. ज्ञानेश्वरांकडून ज्ञानेश्वरीची निर्मिती करण्यातही मुक्ताबाईचा मोलाचा वाटा आहे. 
मुक्ताबाईने चांगदेवाना ‘पासष्टी’ चा अर्थ सांगितला. त्यानंतर चांगदेव महाराज मुक्ताबाईचे पहिले शिष्य झाले. मुक्ताबाईंवर गोरक्षनाथांच्या कृपेचाही वर्षाव झाला होता. त्यानंतर मुक्ताबाईला अमृत संजीवनीची प्राप्ती झाली.

मुक्ताबाई यांची अभंग निर्मितीही अतिशय अर्थपूर्ण आणि समाजाभिमुख आहे. त्यांच्या अभंगातून सर्वांच्या जीवनाच्या अनुषंगाने उल्लेख आढळतो. यातून त्याची माहिती कळते लहान वयात त्यांनी केलेले हे कार्य मोठे आहे. 

अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर हे बहीणा बाई ची कविता आपण नेहमी अनुभवतो. परंतू संत मुक्ताबाई यांनी आपल्या मोठ्या भावंडंसोबत राहून आयुष्याचे अनेक अर्थ सांगितले. 

अशा या संत मुक्ताबाईस विनम्र अभिवादन

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा...

प्रतीक्षा परिचारक-पाठक
औरंगाबाद