मोकळा श्वास .......!

मोकळा श्वास .......! मैत्रिणींसाठी हक्काचं व्यासपीठ.

Saturday, 17 February 2018

स्वतःचे संरक्षण स्वतःच करायचे .

दिल्लीतील ८ महिन्याच्या मुलीवर रेप हि घटना मनाला चटका लावून गेली . आणि जन्मताच मुली असुरक्षित का ? असं वाटायला लागलं. पूर्वीच्या काळी मुलीचा गर्भ  वाढतोय असे कळले तर गर्भ काढण्यात येत असे, हुंडा द्यावा लागतो म्हणून  मुलीचा जन्म नको वाटायचं, कधी घरच्यांच्या दबावा मुळे मुलीचा जन्म नाकारण्यात यायचा.  पण आता मुलगी जन्मायच्या आधीच  माझ्या मुलीवर रेप तर होणार नाही ना ?  अशी भीती वाटायला लागली आहे. यामुळे मुलींच्या जन्मदर कमी होण्यास काहीच वेळ लागणार नाही.

काही घटना अशा आहेत कि  शाळा, कॉलेज, क्लासेसचा रस्ताही आता मुलींसाठी सुरक्षित राहिला नाही असेच  म्हणावे लागेल. वर्तमानपत्र वाचायला घेतले की, हल्ली याच बातम्या जास्त असतात. आजकाल माध्यमांच्या अति खुलेपणामुळे, अतिरंजीत चित्रपट, मालिका यांचे प्रक्षेपण यांचा प्रभाव लोकांवर होत असल्यामुळे, अशा घटनांना मोकळीक मिळत आहे.

खूप दिवसांपूर्वी एक जाहिरात खूप प्रसिद्ध झाली होती. आई पाहिजे, पत्नी पाहिजे, बहीण पाहिजे , मग ....... मुलगी का नको ? पण आता अशी वेळ आली आहे कि घरात मुलगा आणि मुलगी दोघेही पाहिजेत. मुलीला आणि मुलाला समान  वागणूक  दिली गेली पाहिजे . म्हणजे यातून मुलगा मुलगी असा भेदभाव निर्माण होणार नाही.  दोघेही एकमेकांचा आदर करायचा शिकतील. हि सुरवात आधी घरापासून करणे आवश्यक आहे. 

मुली आणि महिलांविषयी आदरभावना मुलांच्या मनात निर्माण होण्यासाठी शाळा, समाज आणि कुटुंब या तिघांचीही जबाबदारी आहे. असे प्रसंग घडले तर कोणालाही न घाबरता शिक्षक, पालक समाज यांना सांगता यावा, ‘गुड टच, बॅड टच ‘ या विषयी माहिती मुलांना घरातून  शाळेतून देण्यात यावी तेही कोणतीही लाज न बाळगता. असे समुपदेशन प्रत्येक पालकांना सुद्धा करणे गरजेचे आहे. आणि शाळेत सुद्धा घेणे गरजेचे आहे. सुरक्षितता हा प्रत्येक मुला मुलीचा अधिकार आहे, कोणालाही  त्यांचे सुंदर आयुष्य विस्कटुन  टाकण्याचा किंवा त्यांचे जीवन अंधःकारमय करण्याचा हक्क नाही.


चला तर मग मुलांना स्वतःचे संरक्षण स्वतःच करायचे शिकवुया आणि समाजाच्या विकृत गुन्हेगारी पासून दूर ठेवूया.

सीमा लिंगायत कुलकर्णी

पुणे

1 comment:

Anonymous said...

chhan lihley seema aj purn vachle mast good