मोकळा श्वास .......!

मोकळा श्वास .......! मैत्रिणींसाठी हक्काचं व्यासपीठ.

Friday, 8 March 2019

महिलादिना निमित्त "स्त्री संता '' विषयी



महाराष्ट्र हि एक संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. त्यात काही स्त्री संत देखील होऊन गेले आहेत. 
||संत जनाबाई ||
संत नामदेवांच्या सहवासात राहून विठ्ठल भक्तीचा ध्यास घेतला होता. म्हणून त्यांची ओळख संत कवयित्री जनाबाई अशी होती. विठू माझा संत जनाबाई यांचा प्रसिद्ध अभंग. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून अजूनही  स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना संत जनाबाईच्या ओव्या गातात.

लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा।।
स्त्रीजाणीव करून देणारा त्यांचाडोईचा पदर आला खांद्यावरी। भरल्या बाजारी जाईन मी हा अभंग
संत जनाबाईंच्या नावावर एकूण सुमारे ३५० अभंग सकल संत गाथा या ग्रंथात मुद्रित झाले आहेत.

||संत सोयराबाई||

अभंगामधून जगण्याचे वास्तव रोखठोक पणे सांगणे हि संत सोयराबाईंची ओळख होती. सोयराबाई यांना संजकडून खूप त्रास सहन कराव लागला होता .

अवघे दु:खाचे सांगाती दु:ख होता पळती आपोआप
आर्या पुत्र भगिनी माता आणि पिता हे अवघे सर्वथा सुखाचेचि

आता आता कुठे विटाळ (पाळी ) कडे बघ्यांच्या लोकांचा दृष्टिकोन बदलत आहे पण . पण सातशे वर्षांपूर्वी देखील याबद्दलचे  त्यांचे विचार हे या अभंगातून दिसून येतात ..त्यांनी असा थेट प्रश्न केला होता कि देहात विटाळ वसतो मग देह कोणी निर्माण केला?

‘’देहासी विटाळ म्हणती सकळ
आत्मा तो निर्मळ शुदध बुद्ध
देहीचा विटाळ देहीच जन्मला
सोवळा तो झाला कवण धर्म’’

त्यांच्या जास्तीत जास्त परखड , वास्तवदर्शी , दुःखद  असे अभंग आहेत .सोयराबाईंचा रंगी रंगला श्रीरंग। अवघा रंग एक झाला हा प्रसिद्ध अभंग आजही तेवढ्याच आवडीने ऐकला जातो.

।। श्री संत वेणाबाई ।।

बहू कष्टलो पातलो जी स्वदेशा !
प्रजा बोलती कौल दे राघवेशा !!

मध्ययुगीन काळात विधवा स्त्रीने कीर्तन करणे हि एक क्रांतीच असायची पण वयाच्या १० व्य वर्षी विधवा झालेल्या संत वेणाबाईंनी समर्थ रामदासांचे शिष्यत्व स्वीकारून त्या कीर्तन करू लागल्या. स्त्री-शिष्यांपैकी फक्त वेणाबाईंनाच उभे राहून कीर्तन करण्याचा अधिकार मिळाला होता. 
वेणाबाईंच्या शैली हि वेगळीच आणि उठावदार होती. त्या स्वतः  गीतरचना, अभंग रचना करतच, आणि त्यासोबत गट देखील असत.  दासविश्रामधामया ग्रंथाचे कर्ते आत्मारामबुवा वेणाबाईंचे वर्णन फार छान करतात.

धन्य वेणाई वेणुमोहित।
वेणुविण गाय सप्रेमयुक्त।।
वेणुधर हरि होय तटस्थ
वेणांकधरवाणी मोहळे।।

||संत महदंबा||

महानुभाव पंथातील एक व्यक्ती आद्य कवयित्री महादंबा किंवा महदाइसा . त्यांच्या जन्म मराठवाड्यातील जालना येथे झालेला आहे. महदाइसा ही चक्रधरस्वामींची शिष्या होत्या. महदाइसेचे लीळाचरित्र’, ’श्री प्रभुचरित्र’, ’स्मृतिस्थळधवळेहे चार ग्रंंथ प्रसिद्ध आहेत. महानुभाव पंथातील महदंबाकृत धवळे हे एक रसाळ काव्य आहे. या काव्यामुळे महदंबेकडे आद्यकवयित्रीचा मान आहे.
एक रसाळ रचना

ऐसें मान आइकौनि मानवले जगन्नाथु :
दारुकाकरवीं आणविला रथु :
अरूढले कृष्णनाथरावो सरिसा विप्र जो आनंदें निर्मरु :
कव्हणा नेणतां देवो चाले कौंडण्यपुरा वेगवतरु :

||संत मुक्ताबाई ||

मराठी साहित्याचे दालन ज्यांच्या मुळे संपन्न झाले आहे अशा ज्ञानदेवांच्या भेनी म्हणजे मुक्त बाई . मुक्ताबाई यांनी ४१ अभंग लिहली आहेत . मुक्ताबाईंचा असा विश्वास होता की संत म्हणजे इतरांवरील टीका स्वीकारणे म्हणून त्या म्हणाल्या , “संत जेणे वहावे,जग बोलण सोसावे मुक्ताबाई यांना मुक्ताई या नावानेही ओळखल्या जाते.

||श्री संत कान्होपात्रा||

या १५ व्या  शतकातल्या  मराठी कवयित्री . आजही मनाचे स्थान आणि विठ्ठल भक्तीचा अभंगरचना  लाभलेल्या कवियत्री म्हणून त्यांची ओळख आहे. कान्होपात्रा या दिसायला खूप सुंदर ,देखण्या होत्या त्यामुळे त्यांना  बिदरच्या बादशहाने पकडून जाण्यास सांगितले तेव्हा त्याच्या मदतीला कोणी धावून आले नाही आपले शील भ्रष्ट होऊ नये म्हणून त्या पंढरपूर्ला गेल्या  पांडूरंगाच्या पायास कडकडून मिठी मारली व आर्तवाणीने पांडुरंगाचा धावा केला आणि तिथेच आप्ले प्राण सोडले.

नको देव राया अंत असा पाहू । प्राण हा सर्वता जावू पाहे ॥
हरीणीचे पाडस । व्याघ्रे धरीयले । मजलागी झाले तैसे देवा ॥
मोकलून आस । जाहले उदास । घेई कान्होपात्रेस ह्र्द्यात ॥

कान्होपात्रा यांचे ३३ अभंग सकल संत गाथाया ग्रंथात समाविष्ट झाले आहेत.

|| संत बहिणाबाई ||

'जुन्यात चमकेलं आणि नव्यात झळकेलं असे बावनकशी'अशा प्रकारे सोन्यासारखे त्यांचे काव्य आहे. असा अभिप्राय त्यांना आचार्य अत्रे यांनी बहिणाबाई याना दिलेला आहे.

अरे खोप्यामधी खोपा, अरे संसार संसार, धरित्रिच्या कुशिमधे, बिना कंपाशीनं उले,मन वढाळ वढाळ, माझी माय सरसोती,

बहिणाबाईंच्या कवितांचा विशेष विषय म्हणजे मनुष्याचा जन्म ,जीवन, मृत्यू यावर आधारित असायचा . त्यांच्या काही काव्यातून मनुष्य आपले पोट भरण्यासाठी कसा प्रयत्न करत असतो. किती कठीण गोष्टींना तोंड द्यावे लागते.

म्हणजे पूर्वीच्या काळी देखील मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई, सोयराबाई, निर्मळा, भागु आणि कान्होपात्र यासारख्या अनेक स्त्री संतांनीच आपल्या भारूड, भक्ती, कीर्तन, ओव्या , अभंग यातून एकोपा कसा वाढवावा , अन्यायाविरुद्ध कसे लढावे, धर्मभाव विसरून एकत्र कसे राहावे हे शिकवले आणि यातूनच भावसंपन्न मराठी कविता समृद्ध  झाली . 

सीमा लिंगायत  कुलकर्णी
पुणे

बहीण प्रेमाचा झरा - संत मुक्ताबाई

  
आज जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा होत आहे. त्यानिमित्ताने बहीण प्रेमाचा झरा देणाऱ्या संत मुक्तबाई यांच्या जीवनातील काही गोष्टीचा उलगडा पाहूया.

महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले त्यात पुरुष बरोबरीने महिला संतानीही समाज प्रबोधनात खूप मोठा हातभार लावला आहे. त्यात संत मुक्ताबाई यांचा उल्लेख करावा लागेल. संत मुक्ताबाई या महाराष्ट्रातील संत-कवयित्री होत्या. संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे त्यांचे थोरले भाऊ होते.

संत मुक्ताबाई ह्या संत ज्ञानेश्वरांच्या धाकट्या बहीण म्हणून सर्वांना परिचित आहेत. परंतु त्यांनी स्वतःचेही स्वतंत्र व्यक्तीमत्व निर्माण केले आहे. 
त्यांनी रचिलेले ''ताटीचे अभंग'' हे त्यांच्या नावावर नोंद झाली आहे. या अभंगांमध्ये त्यांनी संत ज्ञानेश्वरांना काही बोध दिला आहे. त्या योगी चांगदेवांच्या गुरू होत्या. त्यांनी ज्ञानबोध या ग्रंथाचेही लेखन केले आहे.  ह्या ग्रंथामध्ये संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई ह्यांचा संवाद आहे. त्या समाधिस्थ होण्याच्या थोडेसे आधी झालेले हे लिखाण असावे, असे त्यातील अंतर्गत संदर्भांवरून लक्षात येते.

त्यांचा जन्म शके ११९९ किंवा शके १२०१ मध्ये आश्विन शुद्ध प्रतिपदेला (घटस्थापना) झाला असा उल्लेख आहे. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा, मातापित्यांचा देहत्याग, ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईस दिलेली सनद, विसोबा खेचर यांचे शरण येणे हे त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग. शुद्धिपत्र मिळविण्यासाठी चौघे भावडं पैठण गावी आले. “ताटी उघडा ज्ञानेश्वरा” अशी आर्जव मुक्ताईने ज्ञानेश्वरांना केली होती. ज्ञानेश्वरांकडून ज्ञानेश्वरीची निर्मिती करण्यातही मुक्ताबाईचा मोलाचा वाटा आहे. 
मुक्ताबाईने चांगदेवाना ‘पासष्टी’ चा अर्थ सांगितला. त्यानंतर चांगदेव महाराज मुक्ताबाईचे पहिले शिष्य झाले. मुक्ताबाईंवर गोरक्षनाथांच्या कृपेचाही वर्षाव झाला होता. त्यानंतर मुक्ताबाईला अमृत संजीवनीची प्राप्ती झाली.

मुक्ताबाई यांची अभंग निर्मितीही अतिशय अर्थपूर्ण आणि समाजाभिमुख आहे. त्यांच्या अभंगातून सर्वांच्या जीवनाच्या अनुषंगाने उल्लेख आढळतो. यातून त्याची माहिती कळते लहान वयात त्यांनी केलेले हे कार्य मोठे आहे. 

अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर हे बहीणा बाई ची कविता आपण नेहमी अनुभवतो. परंतू संत मुक्ताबाई यांनी आपल्या मोठ्या भावंडंसोबत राहून आयुष्याचे अनेक अर्थ सांगितले. 

अशा या संत मुक्ताबाईस विनम्र अभिवादन

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा...

प्रतीक्षा परिचारक-पाठक
औरंगाबाद

एका शिंपल्यातला मोती -वेणाबाई




एका तर मग , 
ऑडिओ च्या रूपात महिलादिना निमित्त मनीषा मुळे यांनी  ''स्त्री संत'' वेणाबाई यांच्या बद्दलची सांगितलेली माहिती .

मनिषा  मुळे 

औरंगाबाद  

स्त्री संत- कलावती आई


बेळगाव निवासी .पु कलावती देवी यांचा जन्म ऋषीपंचमीच्या दिवशी कारवार येथे झाला .त्यांचे बालपण अतिशय सात्विक  धार्मिक वातावरणात गोकर्ण येथे गेलेत्याकानडी इयत्ता  थी  शिकल्या होत्यात्यांचा विवाह वयाच्या १७ व्य वर्षी झाला १९ व्यावर्षी वैधव्य आलेअवघ्या चार वर्षाचा संसार पण तो हि अगदी छान . त्या म्हणायच्या ज्याला ज्याला संसार चांगला करता आला तो परमार्थात कधीच कमी पडत नाही . पतीची सेवा म्हणजे गुरुसेवा होय . स्वतःच्या अल्पवयीन मुलांना आईकडे ठवून त्या गुरुप्राप्तीसाठी घराबाहेर पडल्या . त्यांचे गुरुहुबळीचे 'सिद्धारूढ महाराज' गुरुसेवा चांगली झाल्यामुळे लवकरच त्यांच्यावर गुरुकृपा झाली ।।ॐनमः शिवाय ।। हा गुरुमंत्र घेवून अज्ञानांचे अज्ञान दूर करण्यासाठी, हरिनाम प्रचारासाठी त्यांनी देह झिजविला.
भक्त त्यांना 'आई' म्हणत. आई कायम म्हणायच्या आपले लक्ष देवाकडे गेले कि देव आपल्या संकटी धावून येतोच. दिवसभरातून एक तास तरी देवाचे समरण करावे , त्याच्या सत्त्तेशिवाय काहीही  नाही त्या प्रापंचिकांनाही स्वछता, काटकसर कशी करावी हेही सांगत . त्या म्हणायच्या एक पैसे शोधण्यासाठी चार पैस्याचे तेल वाया घालवू नये. आवश्यक तेथे जरूर पैसे खर्च करावा. आईंनी प्रापंचीक  व परमार्थीक  मार्गदर्शन पर स्वलिखित अल्पदरातप्रकाशन काढली.सतत नामघेतल्याने संकटाशी झुंज देण्यास बळ मिळते परंतु नाम घेतांना पथ्य सांभाळावी जसे खोत बोलू नये., मनात कपट ठेऊ नये. दुसऱ्यांचे वाईट झाल्यास आनंद मानू नये व देवावरपूर्ण विश्वास ठेवावा . तो जे करतो ते चांगल्यासाठीच हा विश्वास ठेवावा आई सांगतात आपण आगगाडीने प्रवास करताना सामान डोक्यावर घेवून बसतो का?नाही ना! कारण आपल्या बरोबर आपले सामान येणारच , तसेच प्रपंचाची काळजी करू नये. तो कर्ताकरवीत आहे. प्रश्न तो देतो तर उत्तरही तोच देतो. आपण फक्त त्याचे सतत स्मरण ठेवावे.
प.पु आईंनी ८ फेब्रुवारी ७८ रोजी आपला देह ठेवला . पण मनाने आजही आई आमच्या हाकेला धावून येतात त्यांच्या सारखे गुरु आम्हाला लाभले हे आमचे पूर्व पुण्य अश्या स्त्री संत प. पू. कलावती देवी (आईंना )माझे कोटी कोटीप्रणम्य कलयुगात हि भवनदी पार करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आमच्यावर आहे म्हणूनच-

'मरतो तो गुरूंनाही,रडतो तो शिष्य नाही'

।। सद्गुरू सारिखा असता पाठीराखा.
इतरांचा लेख कोण करी ।।

 माधवी शहाणे 

औरंगाबाद 




Thursday, 7 March 2019

अरे संसार संसार - बहिणाबाई


लपे करमाची रेखा 
माझ्या कुंकवाच्या खाली
 पुशिसनी गेल कुंकू
रेखा उघडी पडली 

परिस्थितीचे विदारक, सत्य चित्रण बहिणाबाई या कवितेतून होते. पूर्वीच्या  (१८८० ते १९५१) या काळात पतीच्या पश्चात समाजात वावरत मुलाला (सोपान चौधरी ) मोठे करताना शेतकरी कुटूंबातील या महिला कवयित्रीला जे जे सोसावे लागले . ते ते त्यांच्या साहित्यातून प्रतीत होताना दिसते. अशिक्षित , पण जगाच्या अनुभवातून खूप काही शिकलेल्या बहिणाबाईंचा प्रत्येक शब्द मला त्यामुळेच भावतो.
आज स्त्री पुरुष समानतेच्या जागतिकीकरणाच्या युगातही विविध प्रसंगाना सामोरे जाताना , उंचविद्याविभूषित महिलेला, ताणतणावांचे व्यवस्थापन करण्यास त्यांच्या  काव्याच्या प्रत्येक ओळीतून प्रेरणा मिळेल असे वाटते. स्त्रीचे सौभाग्य , आधार, संरक्षण , साथ सारेच पतीच असतो. हे आज सारे विसरत चालले आहेत. शिक्षण आर्थिक , स्वालंबन , प्रसारमाध्यमे , झगमगाट यात स्त्री आपले कोमलत्व ,नैसर्गिक ऋजुता , वात्सल्य विसरत चालली आहे कि काय असे वाटते. तू तू मै  मै  च्या , बरोबरीच्या या काळात  सहचर्याचा अर्थ समर्पणाचा न राहता स्पर्धेचा होतोय. म्हणूनच बहिणाबाईंच्या कवितेतील प्रत्येक शब्दाचा मतितार्थ पुन्हा जाणून घ्यायची वेळ आली,असे वाटते.
मन वढाय वढाय
उभ्या पीकांतलं ढोर,
किती हांकला हांकला
 फिरी येतं पिकांवर.

मानवी मनाच्या चंचलतेच किती समर्पक , यथार्थ या काव्य पंक्तीत सूचित केलेले आहे.
मन एवढं एवढं
जसा खाकसचा दाना,
मन केवढं केवढं ?
त्यांत आभाया मायेना.

मनोव्यापरा विषयी आज खूप लिहल्या वाचल्या जात,पण या अशिक्षीत , स्वातंत्र्यपूर्व काळातील , विधवा स्त्री कडून जीवनाचे दर्शन घडते.
विभक्त कुटूंब पद्धती,प्रदूषण , मोबाईलचा अतिरेक वापर , पाश्चात्यांचे अंधानुकरण , यातील दिशाहीन युवापिढीस बहिणाबाईंच्या कविता योग्य दिशा दर्शवितात.
धरत्रीच्या कुशीमधी
 बीयाबियानं निजली,
वर्हेपसरली माटी
जशी शाल पांघरली.

सृजनाचा हिरवगार मोहक रूप जग पाहते पण त्यासाठी बियांना  जमिनीत गाडून घ्यावे लागते, जणू मातीची काळ्या मातीची - आईची मायेची शाल बियाणांची पांघरली आहे. सोसण्याशिवाय काही मिळत नाही. हा साधा संदेश  विसरत चालेल्या इन्स्टंटच्या जमण्यात युवापिढीस या कविता वाचण्यास , समजण्यास हव्यात.
साऱ्या जगाचं वास्तल्य सामावलेल्या आईच वर्णन बहिणाबाई करतात.

"माय भिमाई माउली,
 जशी आंब्याची सावली,
आम्हा इले केले गार,
स्वतः उन्हात तावली".

 डेरेदार , पानाफुलांनी भरलेल आंब्याचा झाडं  स्वतः ऊन,वारा  पाऊस सोसून पांथस्थाला गर्द सावली देते. वृद्धाश्रमाची आजची वाढलेली संख्या पाहता या मातेच्या प्रेमाचे संदेश आवश्यकच आहे , युवापिढीसाठी

 दोन्ही नाडा समदुर,
 दोन्हीमधी झीज एक,
दोन्ही बैलांचं ओढणं,
 दोन्हीमधी ओढ एक.

एकाच ओढीने , सारखेच झिजत मोट ओढणाऱ्या बैल जोडी प्रमाणे एकमेकांच्या सहाय्याने जीवनगड ओढत जावे , असेच हे काव्य सुचवते. कुटूंबात सर्वांची सुखदुःख एक असली की  कुटुंब एक राहते . प्रत्येक प्रसंगात सोबतीने मात करते. सर्वजण जमलेले , प्रत्येक आपल्या मोबाईल मध्ये व्यस्त . गृहकलह वाढवतो.
मूल्य घसरत चाललेली, भारतीयसंस्कृती विसरत चाललेली यात मला वाटते. जीवनाचे तत्व, मूल्य सारे बहिणाबाई त्यांच्या काव्यातून सांगतात. म्हणूनच महिला दिनाच्या निमित्याने कार्यक्रमाचे पेव फुटलेले असताना , खोलवर रुजणाऱ्या बहिणाबाईंच्या काव्याचा पुन्हा अभ्यास व्हावा , असे वाटते .

माझं इठ्ठल मंदीर
अवघ्याचं माहेर
माझं इठ्ठल रखूमाई
उभे इटेवर

साऱ्यांचीच माउली असणाऱ्या विठ्लावर श्रद्धा ठेवून आपला, सर्वांचा जीवन प्रवास आनंददायी होवो .

काया काया शेतामंदी
 घाम जीरवं जीरवं,
तवा उगलं उगलं
कायामधून हिरवं. 

सर्व प्राणिमात्रांचे भरणपोषण करणाऱ्या बळीराजाला घामातून मोती पिकवणाऱ्या शेतकऱ्याला त्यांच्या श्रमाचे मोल आज मिळत नाही. कष्टाला पर्याय नाही हे आज लक्षात नाही , म्हणून मला बहिणाबाईंच्या प्रत्येक काव्यपंक्तीतील विचाराचा आज पुन्हा विचार व्हावा असे वाटते !

सौ . संध्या सुधीर पिपंळकर
औरंगाबाद

महिला संत- संत वेणाबाई


        'जय जय रघुवीर समर्थ' ही आरोळी ऐकून एक बारा-तेरा वर्षांची मुलगी समर्थ रामदासस्वामींसमोर आली.
''आपण माझ्याकडून भिक्षा घ्याल ना ?"
हा प्रश्न ऐकून आणि त्या मुलीकडे पाहून समर्थ काय समजायचे ते समजले आणि म्हणाले,"का नाही घेणार ? जरूर घेईन.."
ती मुलगी धावतच आत गेली आणि भिक्षा घेऊन आली. तिच्यापाठोपाठ एक मध्यमवयीन स्त्री पण बाहेर आली. दोघींनी समर्थांना
नमस्कार केला. समर्थ पुढे निघून गेले.
            ही बारा-तेरा वर्षांची मुलगी म्हणजे कोल्हापूरच्या राधाबाई व गोपजीपंत गोसावी यांची मुलगी....वेणाताई. हिचे लग्न मिरजेच्या देशपांडे यांच्या मुलाबरोबर झाले. पण संसार म्हणजे काय ? हे कळायच्या आतच काळाने तिच्या नवऱ्यावर झडप घातली. आणि वेणाताई बालविधवा झाली.
          त्याकाळी एकंदर स्त्रीजीवनच अवघड होते. कारण परकीय सत्ता, परकीय आक्रमण यांच्यामुळे स्त्रियांवर अनेक बंधने होती. आणि ती बंधने योग्यही होती. त्यातून बालविधवा म्हणजे तर बंधनांचे पाश अजूनच घट्ट आवळले जात. घरचाच काय, पण स्वयंपाकघराचा उंबरठाही ओलांडण्याची त्यांना परवानगी नसे. अशा परिस्थितीत वेणाबाई अडकली.
            अशीच एकदा तुळशीवृंदावनाजवळ एकनाथी भागवत वाचत बसलेली असतांना समर्थांची हाक ऐकू आली. तिने भिक्षा घातली. पायावर डोके ठेवले. घरातून सासू आली. तिने समर्थांना आपली व्यथा सांगितली. समर्थांनी वेणाबाईंना 'काय वाचतेस ?' असे विचारले. तिने 'एकनाथी भागवत वाचते,' असे सांगितले. समर्थांनी 'वाचतेस ते समजते का ?' असे विचारले. तेव्हा वेणाबाईंनी  समर्थांना वाचनातील जे समजले नव्हते, त्याबद्दल काही प्रश्न विचारले.  समर्थांनी त्यांची उत्तरे सांगितली. त्यांचे ज्ञान, वक्तृत्व यांनी वेणाबाई प्रभावित झाल्या. त्यांनी समर्थांना आपले गुरु मानले.
        पुढे वेणाबाईंना त्यांच्या सासरच्यांनी त्यांच्या माहेरी आणून सोडले. गोसावी हे समर्थांचे अनुग्रहित होते.त्यामुळे त्यांच्या कीर्तनाला ते जात असत. सोबत वेणाबाईही जात असत. समर्थांचे मार्गदर्शन वेणाबाईंना जीवनाचा मार्ग दाखवणारे ठरले. निराश आयुष्याला रामरायाच्या रूपाने आशेचा किरण दिसला.
        पुढे आईवडिलांनी विचार करून वेणाबाईंना समर्थांकडे सोपवण्याचा निर्णय घेतला.


देह माझे मन माझे। 
सर्व नेले गुरुराजे।। 

अशी अवस्था वेणाबाईंची होती. त्यात आईवडिलांच्या निर्णयाने त्या सुखावल्या.

       समर्थ रामदासांनी वेणाबाईंची अध्यात्मिक आवड, बोलण्याची शैली हे पाहून त्यांच्याकडून अध्यात्मिक अभ्यास करून घेतला. त्याकाळी समर्थांकडे अशा तीन बालविधवा, पण कर्तृत्ववान अशा तीन स्त्रिया होत्या. एक अक्काबाई , अंबिकाबाई आणि वेणाबाई यांच्याकडून समर्थांनी अध्यात्मिक अभ्यास करून घेऊन त्यांना मठाधिपती नेमले.
          त्यात मिरजेच्या मठाची जबादारी वेणाबाईंवर होती. शिवाय चाफळच्या रामनवमीच्या उत्सवाची जबादारी वेणाबाईंवर होती. वेणाबाईचा आवाजही चांगला होता. त्यांच्या अंगीचे हे गुण जाणून समर्थांनी त्यांना कीर्तन कसे करावे हे शिकवले. एकदा समर्थ त्यांना म्हणाले "आज येणाऱ्या भाविकांसमोर तुम्ही कीर्तन करा." वेणाबाई घाबरल्या. कारण विधवा स्त्रीने कीर्तन करणे अशुभ मानले जाई. तिचे दर्शनच अशुभ, तिथे तिचे कीर्तन कोण ऐकणार? पण समर्थांनी त्यांना कीर्तन करण्याची आज्ञा दिली. नाईलाजाने त्या कीर्तनाला उभ्या राहिल्या. स्वतः स्वामी कीर्तन ऐकायला येऊन बसले. वेणाबाईंचे डोळे पाणावले, पण स्वतःला सावरून त्यांनी उत्तम कीर्तन केले. समर्थ खुश झाले. पण समाजकंटकाना हे रुचले नाही. त्यांनी संधीचा फायदा घेऊन वेणाबाईंवर विषप्रयोग केला,पण त्या तेही पचवून उभ्या राहिल्या. त्यांची ही खंबीर मनोवृत्ती पाहून समर्थांनी शिष्येची पाठ थोपटली.

           वेणाबाईंनी अनेक ग्रंथरचना केल्या. त्यात 'उपदेशरहस्य', 'पंचीकरण', 'रामगुहक संवाद', 'रामायणाची कांडे', 'सीतास्वयंवर' तसेच काही अभंगपदे यांच्या रचना केल्या. वेणाबाईंवर समर्थांच्या लिखाणाचा प्रभाव असल्याने ही काव्ये तशीच  यमक प्रधान  आहेत.
           वेणाबाईंवर चाफळच्या रामनवमीच्या  उत्सवाची जबाबदारी असे. एकदा या उत्सवाच्या आधी पंधरा दिवस वेणाबाईंना खूप ताप आला. सर्व कामे खोळंबली. धान्य निवडणे, लोणची, पापड यांची व्यवस्था पाहणे... ही काहीही कामे होईनात. तापामुळे अंगात उभं राहायचीही ताकद नव्हती. तेव्हा शिष्याना सांगून रामापुढे स्वतःला खांबाला बांधून घेऊन त्या रामाची करुणा भाकू लागल्या.


पतित पावन जानकी जीवना 
अरविंदनयना रामराया... ll
अक्का गावा गेली, मज व्यथा झाली 
दयाळा राहीली नवमी तुझी...ll
आक्का गावा जाता, ऐका सीताकांता ll
वेणीच्या आकांता पावा वेगी ll
नवमी समारंभ पाहू द्या बरवा,
मग देह राघवा, जावो-राहो ll

ही करुणा इतकी आर्ततेत त्या म्हणत होत्या की,


ऐकुनी करुणा अयोध्येचा राणा,
मूर्तीच्या नयना अश्रू आले ll
ऐकुनी वचन पतित पावन,
कृपेसी पात्र वेणी केली ll

त्यांची करुणा ऐकून रामाच्या मूर्तीच्या डोळ्यांतून अश्रुधारा येऊ लागल्या. रघुपतीच्या गळ्यातील माळ वेणाबाईंच्या गळ्यात पडली. समर्थ हे सारे पहात होते. ते वेणाबाईंना म्हणाले, "देहाच्या ममतेस्तव देवाला संकटात का घालतेस ?"
वेणा उत्तरली," उत्सवात अडथळा नको म्हणून.... देहाचा मोह नाही."
          या दरम्यान रामबाई नावाची एक बाई वेणाबाईंच्या मदतीला आली. ती 'बत्तीस शिराळ्याहून समर्थांनी मला पाठवले,' असं म्हणाली. तिने सर्व तयारी केली. समर्थ आले. त्यांनी सांगितले की, "मी असं कुणालाही पाठवले नाही,"
           त्या रामबाईचा शोध घेतला, तेव्हा ती सापडली नाही. सगळेजण काय समजायचे ते समजले.
           वेणाबाईंना आता पैलतीर दिसत होता. समर्थ चाफळला आले आहेत, हे कळल्यावर त्या मिरजेहून चाफळला आल्या. त्यांनी समर्थांना विनंती केली,"मला आता आज्ञा द्यावी," पण समर्थ टाळाटाळ करत होते. रोज वेणाबाईंचा एकच धोसरा,"स्वामी मला आज्ञा द्या,"
           एके दिवशी समर्थ म्हणाले, "ठीक आहे, आज निरोप देऊ. समर्थांनी शिष्याना सांगून वेणाबाईंचे जेवणाचे पान आपल्या पानाच्या बाजूला मांडले. चार वाजता वेणाबाई कीर्तनाला उभ्या राहिल्या. समर्थांसह सर्वजण देहभान हरपून ऐकत होते. कीर्तन झाले, आरती झाली. वेणाबाईंनी समर्थांच्या पायावर मस्तक ठेवले.
         तेव्हा समर्थ म्हणाले,"आता माहेराला जावे," हे शब्द कानी पडताच 'जय जय रघुवीर समर्थ... सद्गुरू महाराज की जय...' असं म्हणून वेणाबाई खाली कोसळल्या.
            वेणाबाईंची समाधी जिथे आहे, तिथे चंपकवृक्ष उगवला आहे. त्याची फुलं घेऊन समर्थ रामाची पूजा करत असत.
              धन्य त्या वेणाबाई !
स्त्रियांसाठी असलेली अतिशय अपमानकारक आणि प्रतिकूल परिस्थिती त्यांच्या नशिबात आली असली तरी भक्तिमार्गाने त्यांनी आपले जीवन कंठले. आणि नंतर आपल्या गुरूंची समर्थांची आज्ञा शिरसावंद्य मानून त्यांच्यासमोर देह ठेवला.

मनीषा भास्कर जोशी
औरंगाबाद 

Friday, 14 December 2018

आणि डॉ.काशिनाथ घाणेकर

काल मला रात्री 1नंतर सगळीकडे लाल्या आणी संभाजी दिसत होते. 😊

ते पण उसमें क्या है..’ ,"एकदम कडsssक"  .....😆 

काय?

अहो! खरच एवढा चिकना,गोरा पान,निळसर डोळे,समोरचे केस मागे करण्याची ति स्टाईल यामुळेच अखंड त्याच्या प्रेमात बुडाले म्हणजे  सुबोध च्या (तो वयाने कितीही मोठा असला तरिही सर नाही म्हणार एकेरी च हाक मारणार 😉)

आणि प्रत्यक्ष खरच डॉ.काशिनाथ घाणेकरांना यांना बघण्याची संधी मिळाली असती तर मग विचारुच नका. 🙆‍♀😄😜

डॉ.काशिनाथ घाणेकर यांचे नाव ऐकून होते.पण चित्रपट बघायला जायचे ठरल्यावर.मी काही interview बघितले 
,लेख वाचले, काही नाटक बघीतल्या वरच त्यांना रंगभूमी वरचा  पहिला आंणि शेवटचा सुपरस्टार का म्हणतात हे कळते.

चित्रपटातील मला भावलेले पात्र .

(आणि हो सुबोध तुझ्या ब्द्द्ल शेवटी😊 )

प्रसाद ओक (पणशीकर)- मित्र असावा तर असा .

इरावती घाणेकर (नंदीता पाटकर)- माझे पती सौभाग्यवती मधली तु आठवली आणि या चित्रपटातून परत एकदा तशीच शांत स्वभावाची आणि अतोनात सहनशीलता असणारी दिसली.👍
कांचन घाणेकर (वैदेही परशुरामी)-काय दिसलिस तु👌👌👌 आणी डॉ.कशिनाथ  घाणेकर आल्यावर दार उघडते आणि ति दोघांची नजर अहाहहा .यकदम "मारडाला" आणी "घाणेकर काका"🤔😆

सूमित राघवन (श्रीराम लागू), -लाल झब्यातला तुझा तो तजेलदार चेहरा काही क्षण हुबेहुब डॉ लागू च डोळ्यासमोर आले.

सोनाली कुलकर्णी (सुलोचना), - तुझी आवाजाची जादू नेहमीच मनाला भुरळ घालते. (चित्रपटातील साडया ऐक पेक्षा ऐक सुंदर आहेत.🤗😊)

भालजी पेंढारकर (मोहन जोशी)- नातीचे अचुक मन ओळखणारे.   

वसंत कानेटकर (आनंद इंगळे) -भारदस्त आवाज,चित्रपटात इन्ट्री होताच मराठी भाषेवरच प्रेम दिसते.

 आणि
 डॉ.काशिनाथ घाणेकर (सुबोध) - तुला यासाठी किती मेहनत घ्यावी लागली असेल हे सपुर्ण चित्रपटातून दिसते . 

मी एकटीने (नवरा बाजुला बसलेला असताना 😜 ) थिऐटर मध्ये सुबोध तुझ्या इन्ट्री ला टाळ्या वाजवल्या.खरच खुप सुंदर प्रभावी अभिनय केला आहे.  (माझा नऊ वर्षाचा मुलगा घरात पण प्रत्येक वाक्याच्या शेवटी "एकदम कडsssक"  हा शब्द बोलतो आता .😍☺)

 ‘उसमें क्या है..’ हे शब्द म्हणत त्या काळी  डॉ. काशिनाथ घाणेकर यांनी  आणि आता लाहण्यानपासुन मोठ्यांन पर्यंत सुबोध ने सगळयांवर जादू केली आहे. एकदम कडsssक

चित्रपट का बघावा- 1. सुबोध साठी  2.डॉ.काशिनाथ घाणेकर ही व्यक्ती माहिती होण्या साठी.

😊🤗🙏🏻🎊🎉💐

Tuesday, 26 June 2018

'' सातही जन्म आपण दोघे सोबतच राहू''


  प्रत्येक सणाला स्त्रियांची भूमिका नेहमीच अधोरेखित होत असते. सगळ्याच सणाला आपला भक्तिभाव, आपुलकीची भावना नेहमी अव्वल ठरते कारण त्यातल्या प्रत्येक गोष्टी आपण खुप निर्मळ मनाने करतो.
      हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.
      मी मात्र  वट सावित्रीची पूजा करत नाही . उपवास करते (अगदी डाएट म्हणुन ). बाजारातुन कुठुन तरी तोडून / चोरुन  आणलेली ती वडाची फांदी आपण विकत घेऊन त्या वडाच्या फ़ांदीची पुजा करून पुण्य तर नाहीच मिळणार.  पण त्या झाडाचे शाप नक्कीच लाभतील. आणि वडाच्या झाडा  जवळ जाऊन पूजा करताणा  आपण वाहिलेले ओटी , फळ हे तेथील लोक घेऊन जातात. हे काही माझ्या मनाला पटत नाही . त्या पेक्ष्या एखाद्या गरीब लोकांना काही दान (अन्न  ,फळ )  केले  तर नकीच आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतील .
   पुराणामध्ये घडलेल्या एका घटनेमुळे आजचा वटसावित्री पुजनाचा उत्सव सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले आणी तेव्हापासुन ही सावित्री आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठीदेवाकडे प्रार्थना करते जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी देवाला साकडे तो एक श्रध्देचा भाग आहे.
    चला आता आधुनिक सावित्री कडे येउयात ...आजच्या काळी स्त्री व पुरुष दोघेही कमावतात व स्वताचा संसार चालवतात. आज स्री ही पुरुषाच्या बरोबरीने काम करते. प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. पण बदलत्या काळा नुसार नवरा बायकोच्या नात्यात बदल होत  आहे.  नवरा बायकोने एकमेंकांची काळजी घेतात  , सुख दुःख वाटून घेतात , संसारात कितीही अडचणी आल्या काही वाद झाले तरीही ते शांत पनाने दोघ सोडवतात , यासारखा दोघांनी समजुदार पणा दाखवल्यास नात्याची वीण अजून घट्ट होऊन '' ‘सातही जन्म हाच पती मिळो’अशी कमान न करता , सातही जन्म आपण दोघे सोबतच राहू'' अशी दीर्घायुष्यासाठीची कामना असेल.
       थोडे  निसर्ग कडे जाऊया  पावसाळ्याची चाहूल लागली की येणारा हा पहिलाच सण असतो.
     कायमची  दुष्काळजन्य परिस्थिती बदल्याणासाठी  व पर्यावरणाचे जतन व संरक्षण करून निसर्गचक्र नियमित करण्यासाठी  वटपौर्णिमा अशा वेगवेगळ्या  सण, उत्सवाच्या माध्यमातून वृक्षारोपण करू या . चला, तर मगमैत्रिणींनो या वटपौर्णिमेला नक्कीच एखादे झाड लावून  निसर्गाच संरक्षण आणि संवर्धन करण्याचा निश्चय करु या. 

(वरील लेखात मी माझे विचार मांडलेले आहे.  पण कुणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही .)

सीमा लिंगायत  कुलकर्णी
पुणे

Friday, 18 May 2018

प्रेम स्वरूप आई


ऑडिओ पत्र ऐकलय कधी ?
नाही ना, तर मग ऐका ,
मातृदिना  निमित्त  प्रेम स्वरूप आई विषयी मनीषा मुळे यांनी व्यक्त  केलेल्या भावना ऑडिओ पत्रातून 

मनिषा  मुळे 
औरंगाबाद  

Sunday, 13 May 2018

प्रिय आई

आई आणी मी👭💐😊




प्रिय आई,
ये आई तुला पत्र लिहण्याचा  कधी  प्रसंग आलाच नाही.
पण आज आहे. म्हणून मनाशी ठरवले होते, कि यावेळी मातृदिनाच्या शुभेच्छा पत्रातून द्यायच्या आईमुलाचंनातं म्हणजेविश्वलग्न होऊन सासरी आले पण सगळं अगदी तुझ्या सारखं निटनिटके आणि नवीन काही तरी  करण्याचा सारखा प्रयत्न करत असते .  स्वयंपाक मात्र तुझ्या सारखा चविष्ट करण्याचा अजूनही खूप प्रयत्न करते पण कधी जमतो कधी नाही . पण कधी पाहुणे आल्यावर त्यांनी स्वयंपाकाचे कौतुक केले कि तुमचे जावई लगेच म्हणतात आहेतच आमच्या सासूबाई सुगरण त्यांच्या हाताखाली ट्रेन झाली आहे बायको आमची . हे ऐकून खूप भारी वाटते.
तू नेहमी म्हणायची मुलीने कितीही उच्च शिक्षण घेतले तरी .प्रत्येकाला आनंदी  ठेवायचे असल्यास त्याचा मार्ग पोटातून जात असतो. आई हि मैत्रीण कधी झाली ते कळेच नाही. काळानुसार स्वतःला आणि आम्हालाही जगायला शिकवले. खरंच आई, मी आज स्वतः आई झाल्यावर मला कळतंय आई बनणं इतकं सोपं नाही. अशीच माझ्या पाठीशी सदैव राहा.....!

आणि हो, नेहमी मी येते माहेर पणाला यावेळी तू ये माझ्याकडे माहेर पणाला. मला अजून खूप गप्पा मारायच्या आहेत.

कळावे ,
तुझीच सीमा