“लपे करमाची रेखा
माझ्या
कुंकवाच्या खाली
पुशिसनी गेल कुंकू
रेखा
उघडी पडली ”
परिस्थितीचे विदारक, सत्य चित्रण बहिणाबाई या कवितेतून होते. पूर्वीच्या (१८८० ते १९५१) या काळात पतीच्या पश्चात समाजात वावरत मुलाला (सोपान चौधरी )
मोठे करताना शेतकरी कुटूंबातील या महिला कवयित्रीला जे जे सोसावे लागले . ते ते
त्यांच्या साहित्यातून प्रतीत होताना दिसते. अशिक्षित ,
पण जगाच्या अनुभवातून खूप काही शिकलेल्या बहिणाबाईंचा प्रत्येक शब्द
मला त्यामुळेच भावतो.
आज स्त्री पुरुष समानतेच्या
जागतिकीकरणाच्या युगातही विविध प्रसंगाना सामोरे जाताना ,
उंचविद्याविभूषित महिलेला, ताणतणावांचे
व्यवस्थापन करण्यास त्यांच्या काव्याच्या
प्रत्येक ओळीतून प्रेरणा मिळेल असे वाटते. स्त्रीचे सौभाग्य , आधार, संरक्षण , साथ सारेच पतीच असतो. हे आज सारे
विसरत चालले आहेत. शिक्षण आर्थिक , स्वालंबन , प्रसारमाध्यमे , झगमगाट यात स्त्री आपले कोमलत्व ,नैसर्गिक ऋजुता , वात्सल्य विसरत चालली आहे कि काय
असे वाटते. तू तू मै
मै च्या , बरोबरीच्या
या काळात सहचर्याचा अर्थ समर्पणाचा न
राहता स्पर्धेचा होतोय. म्हणूनच बहिणाबाईंच्या कवितेतील प्रत्येक शब्दाचा
मतितार्थ पुन्हा जाणून घ्यायची वेळ आली,असे वाटते.
“मन वढाय वढाय
उभ्या पीकांतलं ढोर,
किती हांकला हांकला
फिरी येतं पिकांवर.”
मानवी मनाच्या चंचलतेच किती समर्पक ,
यथार्थ या काव्य पंक्तीत सूचित केलेले आहे.
“मन एवढं एवढं
जसा खाकसचा दाना,
मन केवढं केवढं ?
त्यांत आभाया मायेना.”
मनोव्यापरा विषयी आज खूप लिहल्या
वाचल्या जात,पण या अशिक्षीत , स्वातंत्र्यपूर्व काळातील , विधवा स्त्री कडून
जीवनाचे दर्शन घडते.
विभक्त कुटूंब पद्धती,प्रदूषण , मोबाईलचा अतिरेक वापर , पाश्चात्यांचे अंधानुकरण , यातील दिशाहीन युवापिढीस
बहिणाबाईंच्या कविता योग्य दिशा दर्शवितात.
“धरत्रीच्या कुशीमधी
बीयाबियानं निजली,
वर्हेपसरली माटी
जशी शाल पांघरली.”
सृजनाचा हिरवगार मोहक रूप जग पाहते
पण त्यासाठी बियांना जमिनीत गाडून घ्यावे
लागते,
जणू मातीची काळ्या मातीची - आईची मायेची शाल बियाणांची पांघरली आहे.
सोसण्याशिवाय काही मिळत नाही. हा साधा संदेश
विसरत चालेल्या इन्स्टंटच्या जमण्यात युवापिढीस या कविता वाचण्यास ,
समजण्यास हव्यात.
साऱ्या जगाचं वास्तल्य सामावलेल्या
आईच वर्णन बहिणाबाई करतात.
"माय भिमाई माउली,
जशी आंब्याची सावली,
आम्हा इले केले गार,
स्वतः उन्हात तावली".
डेरेदार , पानाफुलांनी
भरलेल आंब्याचा झाडं स्वतः ऊन,वारा पाऊस सोसून पांथस्थाला गर्द
सावली देते. वृद्धाश्रमाची आजची वाढलेली संख्या पाहता या मातेच्या प्रेमाचे संदेश
आवश्यकच आहे , युवापिढीसाठी
“दोन्ही
नाडा समदुर,
दोन्हीमधी झीज एक,
दोन्ही बैलांचं ओढणं,
दोन्हीमधी ओढ एक.”
एकाच ओढीने ,
सारखेच झिजत मोट ओढणाऱ्या बैल जोडी प्रमाणे एकमेकांच्या सहाय्याने
जीवनगड ओढत जावे , असेच हे काव्य सुचवते. कुटूंबात सर्वांची
सुखदुःख एक असली की कुटुंब एक राहते . प्रत्येक
प्रसंगात सोबतीने मात करते. सर्वजण जमलेले , प्रत्येक आपल्या
मोबाईल मध्ये व्यस्त . गृहकलह वाढवतो.
मूल्य घसरत चाललेली,
भारतीयसंस्कृती विसरत चाललेली यात मला वाटते. जीवनाचे तत्व, मूल्य सारे बहिणाबाई त्यांच्या काव्यातून सांगतात. म्हणूनच महिला दिनाच्या
निमित्याने कार्यक्रमाचे पेव फुटलेले असताना , खोलवर
रुजणाऱ्या बहिणाबाईंच्या काव्याचा पुन्हा अभ्यास व्हावा , असे
वाटते .
“माझं इठ्ठल मंदीर
अवघ्याचं माहेर
माझं इठ्ठल रखूमाई
उभे इटेवर”
साऱ्यांचीच माउली असणाऱ्या विठ्लावर
श्रद्धा ठेवून आपला, सर्वांचा जीवन
प्रवास आनंददायी होवो .
“काया काया शेतामंदी
घाम जीरवं जीरवं,
तवा उगलं उगलं
कायामधून हिरवं.”
सर्व प्राणिमात्रांचे भरणपोषण
करणाऱ्या बळीराजाला घामातून मोती पिकवणाऱ्या शेतकऱ्याला त्यांच्या श्रमाचे मोल आज
मिळत नाही. कष्टाला पर्याय नाही हे आज लक्षात नाही , म्हणून मला बहिणाबाईंच्या प्रत्येक काव्यपंक्तीतील विचाराचा आज पुन्हा
विचार व्हावा असे वाटते !
सौ . संध्या सुधीर पिपंळकर
औरंगाबाद
No comments:
Post a Comment