मोकळा श्वास .......!

मोकळा श्वास .......! मैत्रिणींसाठी हक्काचं व्यासपीठ.

Saturday, 10 March 2018

दिवस असे कि फुलायचे.............


 सुंदर अशा गाण्यातून ''लग्नापूर्वीची मी -आजची मी'' या विषयावरील मनिषा  मुळे यांची ऑडिओ क्लिप .

मनिषा  मुळे 

औरंगाबाद   

मन मोकळे .......!


"HAPPY WOMANS DAY TO ALL MY DEAR FRIENDS"

पहिली मी आताची मी विचार येताच एक हसू येत खरंच किती फरक पडतो ना मुलींमध्ये लग्नानंतर 
माझा नवरा तसाही टोमणे मारतच असतो "कशी गरीब शेळी ची वाघीण झालीस ते"
मी एक लाजरी, बुजरी, एकलकोंडी , अभ्यासू आणि एका चौकटीतील ,त्या बाहेरील वातावरणाची कधीही
चव न पाहिलेली. अगदी अतिरेक म्हणजे माझे आई वडील भाऊ , 
 नातेवाईक आणि मोजक्याच मैत्रिणी (ज्यांच्यासोबत आजहि  आहे )
 एवढेच माझे जग होते. त्या व्यतिरिक्त इतर कोणासोबत न बोलणारी मी, 
 आज लोकांचे कान उघडे पर्यंत त्यांना lecture 
देऊ शकते आणि आता मैत्रिणी सुद्धा भरपूर आहेत माझ्याकडे...तुमच्यासारख्याच !!!

लग्नापूर्वीची"मी "
आताची "मी "
लांबसडक केस नेहमी दोन वेण्या
 वर टांगलेल्या 
छोटे केस  शॉर्ट / लाँग लेअर कट 
बारीक सडपातळ  
भरीव
आईपप्पांची लाडकी 
नवऱ्याची डोकेदुखी 
थोडी हट्टी
थोडी समजदार 
एकलकोंडी 
बडबडी
अभ्यासुकिडा
सर्वगुण संपन्न नारी  
भित्री  भागूबाई  
quite धीट
शाळा कॉलेज एवढाच प्रवास करणारी  
ऑफिस सांभाळून घरातील बरीच 
कामे एकटीने पूर्ण करणारी 
मोजक्याच मैत्रिणी 
भरपूर मैत्रिणी 
मनातच बरेच विचार ठेवणारी 
खूप बडबडी आणि मन मोकळ्या
 गप्पा मारणारी 
सायकल वर भावाला कधीही डबल सीट  घेणारी 
आता दोघही मुलांना घेऊन गाडीवर 
 सोडवणारी
TV बंद करून अभ्यास करण्यासाठी भांडणारी 
मुलांनी TV चा अतिरेक करू नये 
म्हणून लक्ष  ठेवणारी  
आईने मदत करायला बोलावल्यावर हातात 
पुस्तक घेऊन बसणारी 
मुलांनाही स्वावलंबीपना शिकवणारी 
स्वयंपाकापासून चार हात लांब राहणारी 
भरभर cooking करणारी ,
 मुलांच्या नवर्याची  आवड जपणारी
लाजरी बुजरी अगदी कधीही jeans  घातलेली   
थोडी खट्टी थोडी मिठी कधी jeans 
तर कधी शालू दिमाखात मिरवणारी 
सलमान खान आणि माधुरी वर
 मनापासून माणारी 
आता TV ला राम राम म्हणणारी 
छोट्या छोट्या गोष्टी मनाविरुद्ध झाल्या
 मुसुमुसु रडणारी 
सगळ्या गोष्टी मनासारख्या घडवून
 आणण्यात expert 
प्रत्येक गोष्ट आईला सांगणारी
अजूनही तशीच प्रत्येक गोष्ट आईला
 सांगणारी


एक आई आणि एक मुलगी यांच्यातील नातं कधीही बदलत नाही आणि आई जवळच आपले सगळे मन मोकळे होते.

तुमचीच सखी
माझे पान  

Sunday, 4 March 2018

आयुष्यात खरी परीक्षा आईच देत असते


आयुष्यात खरी परीक्षा आईच देत असते . 

हे अगदी खरे आहे .  ऐका मग  मनीषा मुळे यांची हि ऑडिओ क्लिप 




मनिषा  मुळे 
औरंगाबाद 

Saturday, 3 March 2018

मनाचा मुजरा समस्त "स्त्रियांसाठी / आईसाठी "


मुळातच काय आहे ना , एखादी शक्ती असेल तर तिची प्रचिती येण्यासाठी तिला फार संकटातून जावे लागते आणि त्यातूनही ती कसा मार्ग काढते आणि पुढे जाते हे सर्वाना बघितल्यावर कळत कि हि शक्ती किती परीक्षा देत असते. 
स्त्री चा जन्मही अगदी असाच आहे , तिला जन्मापासून तर शेवट पर्यंत परीक्षाच द्याव्या लागतात. ती एक शक्ती आहे , प्रचंड ऊर्जेची !!
 स्त्री च्या जन्माच्या तीन अवस्था आहेत बालपण , तारुण्य  (माहेरी आणि सासरी ) वृद्धावस्था. 
बालपण अगदी  मोहक असते मुलींचे सर्व जण लाड करतात होंशी पुरवतात  कारण त्यांना माहित असते एक दिवस हिला सासरी जायचे आहे हि कल्पना जेव्हा मुलीला अवगत होते ना तेव्हाच तिची परीक्षा सुरु होते आणि प्रवास सुरु होतो तारुण्याचा ज्यात तिच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवले जाते तिच्या हसण्या ,बोलण्यावर, वागण्यावर  सुद्धा बंधन यायला  लागतात , मग तिच्या लग्नाचा विषय घरात होऊ लागतो , अगदी जीवापाड जपणारे वडील सुद्धा जेव्हा लग्नाचे विचार येतात , मनावर जड ओझे घेऊन लग्न लावून देतात त्यात हि हि शक्ती अगदी हसत हसत मनातील दुःख लपवत सर्वकाही निमूटपणे सहन करते . आणि आई वडिलांचा विचार करत दिलेल्या घरी आपल्या नेहमीच्या सवयीच्या विरुद्ध असलेल्या घरालाही आपलेसे मनात नवीन संसार सुरु करते त्यातहि तिला बऱ्याच परीक्षा  द्याव्या लागतात.. मग तिचा पूर्णत्वाच्या प्रवास सुरु होतो , जेव्हा तिला आई होण्याची चाहूल लागते, मरण यातना सहूनही हि माऊली आपल्या जिवाच्या तुकड्यासाठी अगदी खंबीरपणे उभी राहते . 
मला खरंच आजही तो दिवस आठवतो ज्या दिवशी माझी मुलगी जन्माला आली , माझ्यात साधं उभे राहण्या एवढे बळ नसतानाही कस मी पाळण्यातून तिला हृदयाशी घेऊन बसलेली , त्या दिवशी समजले आपले मूल हि फक्त आपलीच जबाबदारी असते आणि त्यांना सांभाळणे , संस्कारित करणे , शिकवणे हेही आपलेच  कर्तव्यं आहे  मग त्यांच्या बऱ्याच परीक्षा ह्या आपल्याच होऊन बसतात आणि त्यांच्या वरच टेन्शन आपणच घेत बसतो. 
जस जस वय वाढत तस तस नवरा सुद्धा लहान मुलांसारखा वागायला लागतो , त्याचे हि प्रश्न सोडवणे या माऊलीला अगदी सहज जमते
उतारवयात हि नवऱ्याची सेवा सुश्रुषा करण्याचे काम हि स्वतःच आपल्या खांद्यावर घेते. स्वतःच्या शेवटच्या क्षणापर्यंत परीक्षा देतच असते. 
मनाचा मुजरा समस्त "स्त्रियांसाठी / आईसाठी " 

तु ग दुर्गा, तू भवानी , संसाराची तुच जननी , सारी माया तुझी , अंबे कृपा करी अंबे कृपा करी...... 

तुमचीच सखी 
"माझे पान"  

Saturday, 24 February 2018

स्त्री ही अन्नपूर्णा आहे


मनिषा  मुळे यांची  माजघराचे (स्वयंपाकघर ) बदलते स्वरूप . यावर अप्रतिम अशी ऑडिओ क्लिप . 


मनिषा  मुळे 
औरंगाबाद 

कालाय तस्मे नमः

  मला या गोष्टीचा नेहमी अभिमान आहे की, मी एका ग्रामीण संस्कृतीच्या एकत्र कुटुंबात जन्माला आले. हा अभिमान वाटण्याची अनेक कारणं आहेत. पण त्यातील एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे, माझ्यावर झालेले उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म... या उक्ति प्रमाणे सकस, पौष्टिक स्वयंपाक बनविणे आणि इतरांना खावू घालण्याचे संस्कार...

       माझा जन्म _ऐंशी च्या दशकातला..._ भल्या पहाटे कोंबड्याच्या बांगेने घरातील सर्व कर्ते पुरूष आणि स्त्रीया जाग्या व्हायच्या. पुरुष मंडळी गोठ्यात जावून जनावरांची शेण-घाण साफ-सफाई आणि दूध काढणे त्यांना चारा देणे ही कामे करायची तर इकडे घरात दिवसाची सुरुवात व्हायची ती सड़ा-सारवण, रांगोळी आणि सुचिर्भुत होवून स्वयंपाकाची तयारी करण्याने...

       सकाळचे सर्व विधी उरकुन स्वच्छ अंघोळ करून देवपूजा केली माझी आजी मग ताबा घ्यायची ती माजघराचा... 

तोपर्यंत माझी आई आणि सर्व काकू पण इतर कामे आवरून तयार होवून माजघरात जमा व्हायच्या आजीच्या पुढच्या सुचनांचे पालन करायला.

     मनुष्यच न्हवे तर पशू पक्षी तसेच या जगातील सर्व चल सजीवांची जगण्यासाठी एक जी गरजेची गोष्ट आहे ती म्हणजे अन्न. आणि ते मिळवण्यासाठीच सुरु असते ती त्यांची दिवसरात्र प्रचंड धडपड.

       आता एकदा आजीने माजघरात प्रवेश केला की कामांचे वाटप व्हायचे. माझी एक आत्या तिला ताज्या दह्याचे ताक बनविण्याचे काम आजी द्यायची. _त्यावेळी मिक्सर न्हवते_ आणि कुटुंबं पण छोटी नसायची त्यामुळे सर्व खाण्याच्या गोष्टी पण भरपूर लागायच्या. त्यामुळे एका मोठ्या भांड्यात ताजे दही घेवून ते भांडं माजघरातल्या एका खांबाला टेकवून एक दावं बांधलेल्या मोठ्या रवीने आत्या ताक घुसळू लागायची.

        एक काकू आमच्या वाड्याच्या मागील शेतातून ताजी आणि हिरवीगार भाजी काढून ती स्वच्छ धुवून निवडायला घ्यायची.

       दूसरी काकू जात्यावर गहू, ज्वारी दळायला घ्यायची आणि तयार पीठ माझी आई मळायला घ्यायची. गम्मत नाही किंवा खोटे सांगत नाही पण त्यावेळी आमच्या घरी एका वेळी चपाती असो की भाकरी तीन शेराच्या लागायच्या. (आता जेंव्हा मी दोन वेळेच्या मिळून बारा चपात्या करते तेंव्हा लक्षात येतं की चुलीच्या धुराने डोळे जळजळत असताना देखील तीन शेर पिठाच्या भाकरी करणे म्हणजे काही खायचे काम न्हवे). तिसरी काकू एक शेर मक्याच्या  कण्या आणि एक शेराचा भात शिजवायला ठेवून निवडलेली भाजी चिरणे, कांडा-कुटायची कामे करायची. मग आई चपाती/भाकरी करायची आणि आजी मातीच्या भांड्यांमधे भाज्या बनवायला घ्यायची. कारण घरात बायकांमधे ती सर्वात मोठी होती आणि त्यामुळे तिला सर्वांच्या आवडी-निवड़ी आणि चवींबद्दल सगळे काही माहीत होते. आणि ती नेहमी म्हणायची, "कुणाच्या मनात बसायचं असेल तर आधी त्याच्या पोटात शिरलं पाहिजे पण फक्त म्हणण्या पुरतेच नाही तर खरंच तीने बनवलेला स्वयंपाकातील प्रत्येक पदार्थ हा खाणाऱ्याला तृप्त करून त्याचं मन जिंकायचा.

      आणि मग त्या ताक घुसळीच्या, कांडया-कुट्याच्या आवाजाने आणि तयार स्वयंपाकाच्या घर भरून टाकणाऱ्या सुगंधाने आम्ही बच्चे कंपनी जागे व्हायचो. कसेबसे मीठाने आणि करंजाच्या काडीने दात घासुन गडबड़ीने अंघोळ करायचो की तुटून पडायचो त्या खमंग आणि रुचकर खाण्यावार...

     कालांतराने आजी गेली आणि माजघराची जबाबदारी सर्वस्वी आईकड़े आली. कारण आता ती जेष्ठ आणि सर्वांच्या आवडी-निवड़ी जानणारी होती.

तिनेही तब्बल तीन दशकं ही जबाबदारी लीलया पेलली. या काळात माझं लग्न झालं. मी सासरी आले. तिकडे जगण्यातल्या सोइस्कर गरजा म्हणून सर्व काका वेगळे राहु लागले होते. मी तर मुळातच छोट्या शहरी कुटुंबात आले होते. आणि मग सुरु झाला होता एकाचवेळी माझा आणि आईचा माजघराकडून छोट्या किचन  कड़े प्रवास...

      पण काळ बदल हा निसर्गाचा नियम आहे या नुसार बदलला होता. आता माझ्या या छोटयाश्या किचन  मधे ताक घुसळायच्या रवीची आणि मोठ्या भांड्याची जागा छोट्या विजेवर चालणाऱ्या रवीने ( blender)ने घेतली. उखळाच्या जागी स्वयंचलित मिश्रकाने ( Mixer) घेतली. आणि चुल जावून गॅस शेगड़ी आल्याने आपसुकच जेवण बनवायला लागणारा गॅस आणि वेळ वाचवण्यासाठी मातीची आणि कल्हई केलेली जाड़ पितळेची भांडी जावून पातळ स्टेनलेस स्टील ची भांडी आली.

     यापुढे जावून आत्ता तर विजेवर चालणाऱ्या स्वयंचलित शेगड्या आणि उपकरणांची आता रेलचेल सुरु झाली आहे.

     जग आता वेगवान आणि धावपळीचे झाले आहे त्यामुळे हल्ली माजघराचे आधीच किचन झालेल्या घरातील निर्भेळ पाचक अन्नाची जागा हॉटेल आणि रेस्टॉरंट्स मधील फ़ास्ट फ़ूड ने घेतली. आणि माझ्या जगण्यामधे एक नीरसता आली. मी सतत नाराज राहु लागले. कारण जरी आजकाल लग्न आणि नोकारीसाठी लागणाऱ्या स्वयंमाहितीपत्रकामधे ( Bio-Data) फक्त एक छंद म्हणून लिहला जाणारा म्हणून स्वयंपाक माझ्या आजीने व आईने कधीच केला नाही आणि तेच संस्कार पीढ़ीजात चालत माझ्याकडे आलेले. त्यामुळे स्वयंपाक करणे हे फक्त छंद किंवा काम नव्हे तर माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य अंग आहे.

मला दिवसभर  कितीही काम असले तरीही कामावर जाण्याआधी आणि कामावरून आल्यावर स्वयंपाक करायचा कधीच कंटाळा येत नाही. पण खाणारे खवय्ये नसतील तर बनवण्याचा काय उपयोग?
पण काल एक चमत्कार झाला. माझा एकुलता एक मुलगा नेहमीप्रमाणे रात्री उशिरा घरी आला. आता हे गृहितकच झाले होते की, तो उशिरा घरी आला की बाहेरून जेवूनच येतो. आणि घरात तयार केलेले जेवण दुसऱ्या दिवशी सकाळी कोणाला तरी देवून टाकावे लागते. पण माझं आईचं काळीज ना त्यामुळे तो घरी जेवू अगर ना जेवू मी रोज त्याच्यासाठी काहीतरी नवीन पदार्थ आणि जेवण बनवुनच ठेवते.

आणि आज घरी येताच त्याने मला चक्क दारातूनच हाक दिली, आई ए आई मला लवकर जेवायला वाढ फार भूक लाग़लीय... मला तर धक्काच् बसला... काय घडतंय हे??? पण या धक्यातून सावरत मी पटकन किचेन मधे गेले आणि जेवण गरम करून वाढायला घेतले.

       तो हातपाय धुवून जेवायला बसला आणि माझ्या हातचे जेवण कौतुक करत अगदी आनंदाने जेवत होता. मला तर भरून आले. आणि न राहवुन मी त्याला प्रश्न विचारला, "बाळा हे जेवण तर मी रोज बनवते, आणि असेच बनवते, मग तुला अचानक आजंच एवढे कसे काय आवडले?" आणि त्याचे खाण्यावरचे लक्ष माझ्याकडे गेले. त्याने तसाच उष्ट्या हाताने माझा हात हातात घेतला आणि म्हणाला,"आई आत्ताच एक सिनेमा बघुन आलो आणि मला समजले की तू जेंव्हा एखादा पदार्थ बनवतेस तेंव्हा त्यात फक्त काही वस्तु आणि मसाले घालत नाहीस तर त्यात तू तुझा जीव ओततेस! आणि प्रेमाने आम्हाला खावु घालतेस. 

खरंच आज माझ्या जीवनाचे आणि जेवणाचे सार्थक झाले होते. मी भरून पावले. आणि मी माझ्या विचारात बूडन गेले , घरातले "माजघर" असो किंवा "स्वयंपाक घर" किंवा "लहानसे किचन " स्वयंपाक बनवणारी "स्त्री" असो किंवा "पुरुष" त्याची फक्त स्वयंपाक बनवण्याची वृत्ती निर्मळ आणि स्वयंपाक बनविणे हे आद्य कर्तव्य  समजणारी असावी लागते. मग आपोआपच पदार्थ चवदार होतात, व बनवणाऱ्याला आणि खाणाऱ्याला त्याचा निर्भेळ आनंद मिळतो!

     एवढयात् हाक ऐकू आली, "आई अगं कुठे हरवलीस? जेवण झालं माझं. काही छानसं डेज़र्ट असेल तर दे ना खायला..." आणि मग मघाशीच बनवलेले ताजे गुलाबजाम मी त्याला खायला दिले आणि त्याने लहान मुलासारखे मिटक्या मारत मारत खाल्ले...

धन्यवाद!

सौ. स्नेहल संजय वायचळ,
 पुणे.

चुल बोळकी.......!

चुल बोळकी इवलीशी ती,
आजही खुणवत असते मला...
अद्भुत या तंत्रज्ञानाने,,
हरवून टाकलंय बालपणाला....

                  ☺️स्वप्ना

स्वयंपाक करतांना खूप टेन्शन

मी लहान असल्यापासून स्वयंपाकापासून लांब राहायचे, 

अगदी जेवणहि असं फार मनापासून अगदी चवीने खाण्यासाठी 

आईला काही करायला सांगावे आणि खावे असे कधीच 

झाल्याचे मला आठवत नाही.लहान असल्या पासून फक्त फक्त 

अभ्यास यातच लक्ष असल्यामुळे इतर काम आणि स्वयंपाक कडे 

अगदी दुर्लक्ष ... 🤔


त्यातच काही मानसिक तयारी नसतानाच माझे लग्नही 

GRADUATION करतानाच झाले,😇👰

 नशिबाने नवरा जास्त जिभेचे लाड पुरवून घेणारा नाही म्हणून बरे झाले,🤗 

नाही तर बस्स माझं काही खर नव्हते. मला फक्त पुरणपोळी करता 

यायची,बाकी भाज्या कश्या करायच्या याची ट्रैनिंग बाकी होती. 

आईने सांगितलेले त्यांना जस आवडेल तसे बनवायचे. 

गम्मत म्हणजे मी नवीन नवरी असताना आम्ही जेव्हा पहिल्यांदा 

पुण्यात आले तेव्हा मला सुरुवातीला स्वयंपाक करतांना खूप टेन्शन 

यायचे काय करू कसे करू म्हणून ,पण माझे बरेच टेन्शन माझ्या 

ह्यांनीच दूर केले ते मला म्हणायचे सगळ्या भाज्यांना 

मिरची,लसूण,जिरे,मोहरी फोडणी द्यायची आणि करायची भाजी, 

अजून काय लागत एवढे असं म्हणून ह्यांनी माझा कॉन्फिडन्स वाढवला 

आणि मग मी छान स्वयंपाक शिकले.🤗


माझी मुले नवीन नवीन RECIPES आनंदाने खातात. एक मात्र आहे.

रोजचे नेहमीचे जेवण करायला मात्र थोडे नाक मुरडतात.

 ( शेवटी काय माझीच मुले ती ..)


खर सांगू का ? जर ह्यांनी मला समजून सांभाळून घेतले नसते तर ..... 

विचार हि करवत नाही माझं काय झाले असते. 

असो आता तरी मला बऱ्याच  छान छान पाककला येतात, 

पण काय आहे ना ! नवऱ्याची मदत न घेता केल्यामुळे ते त्यां RECIPES 

ला नको त्या R&D म्हणतात.

तुमचीच सखी 

माझे पान  

Friday, 23 February 2018

बदल हा निसर्गाचा नियम आहे.

स्वयंपाकघर हे नुसते नाव जरी तोंडावर आले तरी तेथील विविध प्रकारच्या चवी जिभेवर रेंगाळतात. मन एकदम प्रसन्न होते. स्वयंपाक घरावर पूर्ण ताबा घरातील स्त्रीचा असतो. मग ती ग्रहिणी असो किंवा नोकरदार ,,, प्रत्येक वस्तूवरून मायेने तिचा हात फिरतो. तिच्या सर्व कृतीतून कोणत्या ना कोणत्या वस्तु हाताळल्या जातात.
   सध्याचे स्वयंपाकघर हे पूर्वीचे माजघर म्हणून ओळखले जायचे. या माजघरामध्ये घरातील स्त्रीचा अधिकाधिक वेळ जात होता.सकाळी उठल्यापासून अगदी दळणकांडण तिची सुरुवात होत असे. पण या कामात गाणी म्हणजेच ओव्या गात गात ती दळण दळत असे. परिणामी मन रमत आणि कामाचा थकवा पण जाणवत नव्हता.अन्न शिजवण्यासाठी चुलीचा उपयोग केला जात होता. त्यावर शिजवलेले अन्न रुचकर आणि स्वादिष्ट लागत असे. फुंकणीने विस्तव तयार करून जो धूर घरात पसरे त्याला  वेगळा सुगंध असे. चुलीवरची भाकरी, पिठले आणि ठेचा ही सारी अमृत तुल्य वाटे .
लोणचे,तक्कू, विविध प्रकारच्या चटण्या यांनी एक कोपरा व्यापलेला असे. माळ्यावर लपवून काही गोष्टी ठेवल्या जात.माऊलीने तूप काढवण्यास काढले की त्याचा सुवास घरभर पसरायचा.इतकी सारी कामे असली तरी सदैव आनंदी आणि प्रसन्न अशी तिची प्रतिमा होती.मुळात माजघरातील सर्व वस्तूंचा ति पुरेपूर उपभोग घेत असे.
      सध्या सर्व परिस्थिति बदलली आहे. माजघराला फक्त स्वयंपाक घराचे स्वरूप आले आहे. ऐसपैस असलेले माजघर आता छोटेसे किचन बनले. जागे अभावी कामापुरत्या वस्तूंनी जागा घेतल्या. जात्या ऐवजी मिक्सर आले. स्विच ऑन केले की दोन मिनिटात पीठ तयार. चुलीला गॅसचा पर्याय आला. खूप कमी वेळेत अन्न शिजू लागले. प्रेशर कुकर ची शिट्टी झाली की वरण भात तयार पाहिजे तेव्हा, पाहिजे त्या चटण्या आणि लोणचे उपलब्ध झाल्याने स्त्रीचा वेळ वाचतोय .
     बदल हा निसर्गाचा नियम आहे. प्रत्येक परिस्थितीत गतीमानता असणे आवश्यक आहे.तर आणि तरच सुधारणा होण्यास मदत होते.म्हणूनच पूर्वीचे जाते,खलबत्ता,उखळ आणि चूल या सार्‍यांची जागा सुधारित वस्तूंनी म्हणजेच बदलत्या स्वरुपात घेतल्या आहेत. या बद्लामुळे वेळेची मोठ्या प्रमाणावर बचत होऊ लागली. मिळालेला रिकामा वेळ स्त्रीला आपल्या स्वतःसाठी देता येऊ लागला.वस्तु आधीच्याच पण बदलत्या स्वरुपामुळे घरातील स्त्रीमधे प्रगति होत गेली.फक्त चूल आणि मूल एवढीच संकल्पना आजच्या स्त्रीची राहिली नसून घरातील सर्व जबाबदारी सांभाळून इतर जोखमीची कामे करणार्‍या महिला दिसतात याचे एकमेव कारण माजघरातील वस्तूंचे बदलते स्वरूप होय.
 आजच्या स्थितीत फक्त चूल आणि मूल एवढीच संकल्पना आजच्या स्त्रीची राहिलेली नसून पुढारीत आणि शिक्षित घडली आहे. वस्तूंच्या बदलत्या स्वरूपाने हे सहज शक्य झाले आहे.

शिवांगी विजय कुलकर्णी
    संभाजीनगर                                                    


माजघर हे तीचं साम्राज्य


अपर्णा मानोलीकर ( जहागिरदार )
परभणी