मोकळा श्वास .......!

मोकळा श्वास .......! मैत्रिणींसाठी हक्काचं व्यासपीठ.

Saturday, 24 February 2018

कालाय तस्मे नमः

  मला या गोष्टीचा नेहमी अभिमान आहे की, मी एका ग्रामीण संस्कृतीच्या एकत्र कुटुंबात जन्माला आले. हा अभिमान वाटण्याची अनेक कारणं आहेत. पण त्यातील एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे, माझ्यावर झालेले उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म... या उक्ति प्रमाणे सकस, पौष्टिक स्वयंपाक बनविणे आणि इतरांना खावू घालण्याचे संस्कार...

       माझा जन्म _ऐंशी च्या दशकातला..._ भल्या पहाटे कोंबड्याच्या बांगेने घरातील सर्व कर्ते पुरूष आणि स्त्रीया जाग्या व्हायच्या. पुरुष मंडळी गोठ्यात जावून जनावरांची शेण-घाण साफ-सफाई आणि दूध काढणे त्यांना चारा देणे ही कामे करायची तर इकडे घरात दिवसाची सुरुवात व्हायची ती सड़ा-सारवण, रांगोळी आणि सुचिर्भुत होवून स्वयंपाकाची तयारी करण्याने...

       सकाळचे सर्व विधी उरकुन स्वच्छ अंघोळ करून देवपूजा केली माझी आजी मग ताबा घ्यायची ती माजघराचा... 

तोपर्यंत माझी आई आणि सर्व काकू पण इतर कामे आवरून तयार होवून माजघरात जमा व्हायच्या आजीच्या पुढच्या सुचनांचे पालन करायला.

     मनुष्यच न्हवे तर पशू पक्षी तसेच या जगातील सर्व चल सजीवांची जगण्यासाठी एक जी गरजेची गोष्ट आहे ती म्हणजे अन्न. आणि ते मिळवण्यासाठीच सुरु असते ती त्यांची दिवसरात्र प्रचंड धडपड.

       आता एकदा आजीने माजघरात प्रवेश केला की कामांचे वाटप व्हायचे. माझी एक आत्या तिला ताज्या दह्याचे ताक बनविण्याचे काम आजी द्यायची. _त्यावेळी मिक्सर न्हवते_ आणि कुटुंबं पण छोटी नसायची त्यामुळे सर्व खाण्याच्या गोष्टी पण भरपूर लागायच्या. त्यामुळे एका मोठ्या भांड्यात ताजे दही घेवून ते भांडं माजघरातल्या एका खांबाला टेकवून एक दावं बांधलेल्या मोठ्या रवीने आत्या ताक घुसळू लागायची.

        एक काकू आमच्या वाड्याच्या मागील शेतातून ताजी आणि हिरवीगार भाजी काढून ती स्वच्छ धुवून निवडायला घ्यायची.

       दूसरी काकू जात्यावर गहू, ज्वारी दळायला घ्यायची आणि तयार पीठ माझी आई मळायला घ्यायची. गम्मत नाही किंवा खोटे सांगत नाही पण त्यावेळी आमच्या घरी एका वेळी चपाती असो की भाकरी तीन शेराच्या लागायच्या. (आता जेंव्हा मी दोन वेळेच्या मिळून बारा चपात्या करते तेंव्हा लक्षात येतं की चुलीच्या धुराने डोळे जळजळत असताना देखील तीन शेर पिठाच्या भाकरी करणे म्हणजे काही खायचे काम न्हवे). तिसरी काकू एक शेर मक्याच्या  कण्या आणि एक शेराचा भात शिजवायला ठेवून निवडलेली भाजी चिरणे, कांडा-कुटायची कामे करायची. मग आई चपाती/भाकरी करायची आणि आजी मातीच्या भांड्यांमधे भाज्या बनवायला घ्यायची. कारण घरात बायकांमधे ती सर्वात मोठी होती आणि त्यामुळे तिला सर्वांच्या आवडी-निवड़ी आणि चवींबद्दल सगळे काही माहीत होते. आणि ती नेहमी म्हणायची, "कुणाच्या मनात बसायचं असेल तर आधी त्याच्या पोटात शिरलं पाहिजे पण फक्त म्हणण्या पुरतेच नाही तर खरंच तीने बनवलेला स्वयंपाकातील प्रत्येक पदार्थ हा खाणाऱ्याला तृप्त करून त्याचं मन जिंकायचा.

      आणि मग त्या ताक घुसळीच्या, कांडया-कुट्याच्या आवाजाने आणि तयार स्वयंपाकाच्या घर भरून टाकणाऱ्या सुगंधाने आम्ही बच्चे कंपनी जागे व्हायचो. कसेबसे मीठाने आणि करंजाच्या काडीने दात घासुन गडबड़ीने अंघोळ करायचो की तुटून पडायचो त्या खमंग आणि रुचकर खाण्यावार...

     कालांतराने आजी गेली आणि माजघराची जबाबदारी सर्वस्वी आईकड़े आली. कारण आता ती जेष्ठ आणि सर्वांच्या आवडी-निवड़ी जानणारी होती.

तिनेही तब्बल तीन दशकं ही जबाबदारी लीलया पेलली. या काळात माझं लग्न झालं. मी सासरी आले. तिकडे जगण्यातल्या सोइस्कर गरजा म्हणून सर्व काका वेगळे राहु लागले होते. मी तर मुळातच छोट्या शहरी कुटुंबात आले होते. आणि मग सुरु झाला होता एकाचवेळी माझा आणि आईचा माजघराकडून छोट्या किचन  कड़े प्रवास...

      पण काळ बदल हा निसर्गाचा नियम आहे या नुसार बदलला होता. आता माझ्या या छोटयाश्या किचन  मधे ताक घुसळायच्या रवीची आणि मोठ्या भांड्याची जागा छोट्या विजेवर चालणाऱ्या रवीने ( blender)ने घेतली. उखळाच्या जागी स्वयंचलित मिश्रकाने ( Mixer) घेतली. आणि चुल जावून गॅस शेगड़ी आल्याने आपसुकच जेवण बनवायला लागणारा गॅस आणि वेळ वाचवण्यासाठी मातीची आणि कल्हई केलेली जाड़ पितळेची भांडी जावून पातळ स्टेनलेस स्टील ची भांडी आली.

     यापुढे जावून आत्ता तर विजेवर चालणाऱ्या स्वयंचलित शेगड्या आणि उपकरणांची आता रेलचेल सुरु झाली आहे.

     जग आता वेगवान आणि धावपळीचे झाले आहे त्यामुळे हल्ली माजघराचे आधीच किचन झालेल्या घरातील निर्भेळ पाचक अन्नाची जागा हॉटेल आणि रेस्टॉरंट्स मधील फ़ास्ट फ़ूड ने घेतली. आणि माझ्या जगण्यामधे एक नीरसता आली. मी सतत नाराज राहु लागले. कारण जरी आजकाल लग्न आणि नोकारीसाठी लागणाऱ्या स्वयंमाहितीपत्रकामधे ( Bio-Data) फक्त एक छंद म्हणून लिहला जाणारा म्हणून स्वयंपाक माझ्या आजीने व आईने कधीच केला नाही आणि तेच संस्कार पीढ़ीजात चालत माझ्याकडे आलेले. त्यामुळे स्वयंपाक करणे हे फक्त छंद किंवा काम नव्हे तर माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य अंग आहे.

मला दिवसभर  कितीही काम असले तरीही कामावर जाण्याआधी आणि कामावरून आल्यावर स्वयंपाक करायचा कधीच कंटाळा येत नाही. पण खाणारे खवय्ये नसतील तर बनवण्याचा काय उपयोग?
पण काल एक चमत्कार झाला. माझा एकुलता एक मुलगा नेहमीप्रमाणे रात्री उशिरा घरी आला. आता हे गृहितकच झाले होते की, तो उशिरा घरी आला की बाहेरून जेवूनच येतो. आणि घरात तयार केलेले जेवण दुसऱ्या दिवशी सकाळी कोणाला तरी देवून टाकावे लागते. पण माझं आईचं काळीज ना त्यामुळे तो घरी जेवू अगर ना जेवू मी रोज त्याच्यासाठी काहीतरी नवीन पदार्थ आणि जेवण बनवुनच ठेवते.

आणि आज घरी येताच त्याने मला चक्क दारातूनच हाक दिली, आई ए आई मला लवकर जेवायला वाढ फार भूक लाग़लीय... मला तर धक्काच् बसला... काय घडतंय हे??? पण या धक्यातून सावरत मी पटकन किचेन मधे गेले आणि जेवण गरम करून वाढायला घेतले.

       तो हातपाय धुवून जेवायला बसला आणि माझ्या हातचे जेवण कौतुक करत अगदी आनंदाने जेवत होता. मला तर भरून आले. आणि न राहवुन मी त्याला प्रश्न विचारला, "बाळा हे जेवण तर मी रोज बनवते, आणि असेच बनवते, मग तुला अचानक आजंच एवढे कसे काय आवडले?" आणि त्याचे खाण्यावरचे लक्ष माझ्याकडे गेले. त्याने तसाच उष्ट्या हाताने माझा हात हातात घेतला आणि म्हणाला,"आई आत्ताच एक सिनेमा बघुन आलो आणि मला समजले की तू जेंव्हा एखादा पदार्थ बनवतेस तेंव्हा त्यात फक्त काही वस्तु आणि मसाले घालत नाहीस तर त्यात तू तुझा जीव ओततेस! आणि प्रेमाने आम्हाला खावु घालतेस. 

खरंच आज माझ्या जीवनाचे आणि जेवणाचे सार्थक झाले होते. मी भरून पावले. आणि मी माझ्या विचारात बूडन गेले , घरातले "माजघर" असो किंवा "स्वयंपाक घर" किंवा "लहानसे किचन " स्वयंपाक बनवणारी "स्त्री" असो किंवा "पुरुष" त्याची फक्त स्वयंपाक बनवण्याची वृत्ती निर्मळ आणि स्वयंपाक बनविणे हे आद्य कर्तव्य  समजणारी असावी लागते. मग आपोआपच पदार्थ चवदार होतात, व बनवणाऱ्याला आणि खाणाऱ्याला त्याचा निर्भेळ आनंद मिळतो!

     एवढयात् हाक ऐकू आली, "आई अगं कुठे हरवलीस? जेवण झालं माझं. काही छानसं डेज़र्ट असेल तर दे ना खायला..." आणि मग मघाशीच बनवलेले ताजे गुलाबजाम मी त्याला खायला दिले आणि त्याने लहान मुलासारखे मिटक्या मारत मारत खाल्ले...

धन्यवाद!

सौ. स्नेहल संजय वायचळ,
 पुणे.

3 comments:

OMMAD said...

अतिशय उत्तम आणि आशयबद्ध लेख.
आठवण झाली त्या दिवसांची जेंव्हा माझ्याही घरात माजघर होते.

Unknown said...

khupch chan.......

Anonymous said...

atishay sunder